बेळगाव / प्रतिनिधी
राज्यसरकारने कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी विकेंड कर्फ्यु लागू केला आहे. शुक्रवारी रात्री 9 वाजल्यापासून याला सुरूवात झाली. याकाळात औद्योगिक कारखाने सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आल्याने शनिवारी कारखाने सुरू असल्याचे दिसून आले. एकूण 75 टक्के कारखाने सुरू ठेवण्यात आले होते तर ओळखपत्र नसल्याने 25 टक्के लघु उद्योग बंद ठेवण्यात आले होते.
कोरोना फैलाव दिवसांदिवस वाढताना दिसत आहे. यामुळे हे प्रमाण आटोक्मयात आणण्यासाठी सरकारने नाईट तसेच विकेंड कर्फ्यु सुरू करण्याचा निर्णय घेतला. विकेंड कर्फ्युच्यावेळी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले होते. औद्योगिक वसाहती सुरू ठेवाव्या की बंद कराव्यात याबाबत मात्र संभ्रम होता. बेळगावचा आर्थिक कणा म्हणून औद्योगिक वसाहतींची ओळख आहे. दररोज 7 ते 8 हजार कामगार थेट तर उर्वरीत 4 ते 5 हजार कामगार त्यावर आधारलेल्या व्यवसायावर काम करत असल्याने औद्योगिक वसाहती सुरु ठेवण्याची मागणी करण्यात येत होती.
शुक्रवारी सायंकाळी जिल्हा उद्योग केंद्र (डीआयसी) चे अधिकारी दोड्डबसवराजू यांनी काही अटींवर कारखाने सुरू करण्याची परवानगी देण्यात येत असल्याचे सांगितले. प्रत्येक कारखान्याने आपल्या कामगारांना ओळखपत्र द्यायच्या सूचना त्यांनी केल्या होत्या. त्यानुसार शनिवारी सकाळपासून कारखाने सुरूळीत पद्धतीने सुरू करण्यात आले होते. तिसरा रेल्वेगेट, बेम्को कॉर्नर, फाऊंड्री क्लस्टर कार्नर, मजगाव कॉर्नर परिसरात पोलिसांकडून ओळखपत्रे पाहून कामगारांना कामावर जाण्याची परवानगी देण्यात येत होती.
शनिवारी 75 टक्के कारखाने सुरू
शुक्रवारी कारखाने सुरू ठेवण्याचा निर्णय रात्री उशिराने झाल्याने लहान कारखान्यांच्या कामगारांना सुट्टय़ा देण्यात आल्या. एकाच दिवसात ओळखपत्रे तयार करून घेणे शक्मय नव्हती तसेच बस बंद राहिल्याने कारखाने बंद ठेवण्यात आले. उर्वरीत 75 टक्के कारखाने मात्र सुरळीत पद्धतीने सुरू ठेवण्यात आले होते. कुठेही गर्दी होणार नाही याची खबरदारी कारखान्यांकडून घेण्यात येत होती. 3 शिफ्टमध्ये सुरळीत पद्धतीने काम सुरू झाल्याने कामगारांमधून समाधान व्यक्त होत होते.









