प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव शहर व जिल्हय़ात कोरोना रुग्णसंख्येत झपाटय़ाने वाढ होत आहेत. अशा परिस्थितीत युद्धपातळीवर रुग्णसेवेला लागण्याची जबाबदारी असलेल्या सिव्हिल हॉस्पिटलमधील डॉक्टरांची मनमानी सुरू झाली आहे. शनिवारी सायंकाळी उपचारासाठी दाखल झालेल्या एका वृद्धाला घरी पाठविण्यात आल्याचा अमानवी प्रकार समोर आला आहे. केवळ कोरोना लक्षणे असणाऱयांवरच उपचार केले जातील, असे सांगत अत्यवस्थ वृद्धाला घरी वापस पाठविण्यात आले आहे.
या प्रकाराने संताप व्यक्त करण्यात येत असून माजी महापौर सरिता पाटील व मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्या प्रयत्नातून रात्री त्या वृद्धाला परत सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. गेल्या वषी वाढती रुग्णसंख्या लक्षात घेऊन सिव्हिल प्रशासनाने कोविड हॉस्पिटलचा दर्जा दिला होता. केवळ कोरोना रुग्णांवरच उपचार केले जात होते. यंदा यासंबंधी अद्याप निर्णय झाला नाही. तरीही येथील डॉक्टरांनी जबाबदारी झटकत मनमानी सुरू केली आहे.
यासंबंधी मिळालेली माहिती अशी, की रामलिंगखिंड गल्ली येथील शशिकांत करंबळकर (वय 79) यांना मूत्राशयासंबंधीचा त्रास होता. गेल्या 50 वर्षांपासून शशिकांत हे ज्योतिषी कार्यालय चालवतात. ते आपल्या भावासमवेत या परिसरात राहतात. त्यांची आरोग्यस्थिती लक्षात आल्याने ‘हेल्प फॉर निडी’चे सुरेंद्र अनगोळकर यांना बोलावून माजी महापौर सरिता पाटील यांनी शशिकांत यांना उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला पाठविले.
सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास त्यांना सिव्हिल हॉस्पिटलमधील कॅज्युलिटी विभागात देण्यात आले. डॉक्टरांनी दीड तास त्यांना दाखल करून घेतले. त्यांना सलाईन देण्यात आली. सात वाजता दुसऱया एका रुग्णवाहिकेतून त्यांना घरी पाठविण्यात आले. घरची गरिबी व सुश्रुषेसाठी घरात कोणी नाही. खासगी इस्पितळाचा खर्च परवडत नाही. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वेळेत उपचार होत नाहीत, अशा विचित्र परिस्थितीचा फटका या वृद्धाला बसला.
सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास खासगी रुग्णवाहिकेत शशिकांत यांना पुन्हा रामलिंगखिंड गल्ली येथे आणण्यात आले. हा प्रकार समजताच सरिता पाटील यांनी मनपाचे आरोग्याधिकारी डॉ. संजीव डुमगोळ यांच्याशी संपर्क साधला. बिम्स प्रशासनाशी चर्चा करून रात्री त्या वृद्धाला आरोग्याधिकाऱयांच्या मदतीने पुन्हा सिव्हिलमध्ये दाखल करण्यात आले. 79 वर्षांच्या वृद्धाला उपचाराविना परत पाठविणाऱया बिम्स प्रशासनाच्या कारभाराबद्दल संताप व्यक्त करण्यात येत आहे.
यासंबंधी ‘तरुण भारत’ने बिम्सचे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांच्याशी संपर्क साधला असता हा प्रकार आपल्या निदर्शनास आला नाही. सर्जिकल ब्लॉकमध्ये चार कोरोना रुग्ण आहेत. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. म्हणून या वृद्धाला घरी पाठविले असेल, असे सांगत त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. अद्याप कोविड हॉस्पिटल अशी घोषणा झाली नाही, तरीही उपचारासाठी दाखल झालेल्या रुग्णांना परत कसे पाठविता? असा प्रश्न विचारला असता हा प्रकार आपल्या लक्षात आला नसल्याचे त्यांनी सांगितले.
गरिबांनी जायचे कोठे?
गोरगरीब रुग्ण उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलला प्राधान्य देतात. कारण खासगी इस्पितळातील खर्च परवडत नाहीत. कोरोना महामारीचा फैलाव वाढत असताना बाधितांवर उपचाराची बिम्स प्रशासनावर मोठी भिस्त आहे. जिल्हाधिकारी डॉ. के. हरीशकुमार यांनी वारंवार बिम्समधील अधिकाऱयांच्या बैठका घेऊन रुग्णांची गैरसोय होऊ नये, अशा सूचना केल्या आहेत. तरीही उपचारासाठी दाखल झालेल्या 79 वषीय वृद्धाला केवळ दीड तासात घरी पाठविण्यात आले. त्यामुळे गोरगरीब रुग्णांनी उपचारासाठी जायचे तरी कोठे? असा प्रश्न निर्माण झाला आहे. बिम्समधील गैरकारभार वाढला आहे. कोणाचा पायपोस कोणाच्यात नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. सुरुवातीलाच अशी स्थिती आहे तर बेळगावकरांनी कोरोनाचा सामना कसा करावा? असा प्रश्न उपस्थित होत आहे.









