दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव 210 धावात खुर्दा, बुमराहचे 42 धावात 5 बळी, किगन पीटरसनची एकाकी झुंज
केपटाऊन / वृत्तसंस्था
जलद गोलंदाज जसप्रित बुमराहने 42 धावात निम्मा संघ गारद केल्यानंतर दक्षिण आफ्रिकेला भारताविरुद्ध तिसऱ्या व शेवटच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात सर्वबाद 210 धावांवर समाधान मानावे लागले. बुधवारी या लढतीच्या दुसऱया दिवशी चहापानावेळी 7 बाद 176 अशी स्थिती असलेल्या यजमान संघाला आणखी 34 धावांच्या बदल्यात उर्वरित 3 बळी गमवावे लागले. द. आफ्रिकन संघातर्फे किगन पीटरसनने एकाकी झुंज देत 166 चेंडूत सर्वाधिक 72 धावांचे योगदान दिले. भारताने दिवसअखेर 2 बाद 57 धावा जमवत एकत्रित आघाडी 70 वर नेली. विराट 14 तर पुजारा 9 धावांवर खेळत होते.
प्रारंभी, स्पीडस्टार जसप्रित बुमराहने द. आफ्रिकेच्या या पहिल्या डावात एल्गार (3), मॅरक्रम (8), पीटरसन (72), जान्सन (7), एन्गिडी (3) यांचे बळी घेत दक्षिण आफ्रिकेचा निम्मा संघ गारद केला. त्याला मोहम्मद शमी (2-39), उमेश यादव (2-64) व शार्दुल ठाकुर (1-37) यांची समयोचित साथ लाभली. बुधवारी 1 बाद 17 या मागील धावसंख्येवरुन डावाला पुढे सुरुवात केल्यानंतर यजमान संघाला पहिल्या सत्रात 2 तर उपाहारानंतरच्या सत्रात 4 बळी गमवावे लागले.
बुमराहने दिवसातील दुसऱयाच चेंडूवर मॅरक्रमला (8) त्रिफळाचीत करत भारतीय संघाला स्वप्नवत सुरुवात करुन दिली. मॅरक्रम चेंडू सोडून देण्याच्या पवित्र्यात होता. मात्र, चेंडू किंचीत वळत ऑफस्टम्प उडवून गेला आणि मॅरक्रमसाठी देखील हा धक्का होता. केशव महाराजला उमेश यादवने एका अप्रतिम चेंडूवर त्रिफळाचीत करत दक्षिण आफ्रिकन संघाला आणखी एक धक्का दिला. केशव महाराजने 74 मिनिटे फलंदाजी करत 45 चेंडूत 25 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकारांचा समावेश राहिला.

नंतर रॅस्सी व्हान डेर डय़ुसेनला उमेश यादवनेच कोहलीकरवी झेलबाद केले. डय़ुसेनने 54 चेंडूत 21 धावा जमवल्या. पाचव्या स्थानी फलंदाजीला उतरलेल्या बवूमाने (52 चेंडूत 28) शमीच्या गोलंदाजीवर दुसऱया स्लीपमध्ये कोहलीकडे झेल दिला. कोहलीने आपल्या डावीकडे झेपावत हा अप्रतिम झेल टिपला. शमीने याच षटकात व्हेरेनला देखील तंबूचा रस्ता दाखवला. व्हेरेनने यष्टीमागे पंतकडे सोपा झेल दिला. पुढे बुमराहने जान्सनला स्वस्तात बाद करत आपला तिसरा बळी नोंदवला.
कीगन पीटरसनने यजमान संघातर्फे सर्वाधिक 72 धावांची खेळी साकारली. त्याने 249 मिनिटे खेळपट्टीवर ठाण मांडत 166 चेंडूंचा सामना केला. त्याच्या या डावात 9 चौकारांचा समावेश राहिला. अखेर बुमराहने पुजाराकरवी झेलबाद करत पीटरसनची खेळी संपुष्टात आणली. कॅगिसो रबाडाने (25 चेंडूत 15) शार्दुलच्या गोलंदाजीवर लाँगऑफवरील बुमराहकडे झेल दिला. बुमराहने नंतर एन्गिडीला बाद केले आणि दक्षिण आफ्रिकेचा डाव 210 धावांमध्ये संपुष्टात आला. बुमराहसाठी हा डावातील पाचवा बळी होता. अश्विनने एक्स्ट्रा कव्हरवर झेल टिपला.
धावफलक
भारत पहिला डाव ः सर्वबाद 223.
दक्षिण आफ्रिका पहिला डाव ः डीन एल्गार झे. पुजारा, गो. बुमराह 3 (16 चेंडू), एडन मॅरक्रम त्रि. गो. बुमराह 8 (22 चेंडूत 1 चौकार), केशव महाराज त्रि. गो. यादव 25 (45 चेंडूत 4 चौकार), कीगन पीटरसन झे. पुजारा, गो. बुमराह 72 (166 चेंडूत 9 चौकार), रॅस्सी व्हान डेर डय़ुसेन झे. कोहली, गो. यादव 21 (54 चेंडू), तेम्बा बवूमा झे. कोहली, गो. शमी 28 (52 चेंडूत 4 चौकार), काईल व्हेरेन झे. पंत, गो. शमी 0 (2 चेंडू), मार्को जान्सन त्रि. गो. बुमराह 7 (26 चेंडू), कॅगिसो रबाडा झे. बुमराह, गो. शार्दुल 15 (25 चेंडूत 1 चौकार), डय़ुआन ऑलिव्हिएर नाबाद 10 (39 चेंडूत 2 चौकार), लुंगी एन्गिडी झे. अश्विन, गो. बुमराह 3 (17 चेंडू). अवांतर 18. एकूण 76.3 षटकात सर्वबाद 210.
गडी बाद होण्याचा क्रम
1-10 (एल्गार, 4.4), 2-17 (मॅरक्रम, 8.2), 3-45 (केशव महाराज, 20.2), 4-112 (डय़ुसेन, 39.2), 5-159 (बवूमा, 55.2), 6-159 (व्हेरेन, 55.4), 7-176 (जान्सन, 62.2), 8-179 (पीटरसन, 64.4), 9-200 (रबाडा, 71.3), 10-210 (एन्गिडी, 76.3).
गोलंदाजी
जसप्रित बुमराह 23.3-8-42-5, उमेश यादव 16-3-64-2, मोहम्मद शमी 16-4-39-2, शार्दुल ठाकुर 12-2-37-1, रविचंद्रन अश्विन 9-3-15-0.
भारत दुसरा डाव ः केएल राहुल झे. मॅरक्रम, गो. जान्सन 10 (22 चेंडूत 2 चौकार), मयांक अगरवाल झे. एल्गार, गो. रबाडा 7 (15 चेंडूत 1 चौकार), चेतेश्वर पुजारा खेळत आहे 9 (31 चेंडूत 2 चौकार), विराट कोहली खेळत आहे 14 (39 चेंडूत 2 चौकार). अवांतर 17. एकूण 17 षटकात 2 बाद 57.
गडी बाद होण्याचा क्रम
1-20 (मयांक, 4.5), 2-24 (केएल राहुल, 5.5).
गोलंदाजी
रबाडा 6-1-25-1, ऑलिव्हिएर 2-0-13-0, जान्सन 5-3-7-1, एन्गिडी 3-3-0-0, केशव महाराज 1-1-0-0.
विराटचे कसोटी क्रिकेटमध्ये झेलांचे ‘शतक’
भारतीय कसोटी कर्णधार नोव्हेंबर 2019 पासून फलंदाजीत एकही कसोटी शतक झळकावू शकला नसला तरी बुधवारी त्याने येथे 100 वा झेल घेत झेलांचे अनोखे शतक साजरे केले. न्यू लँड्सवरील या कसोटी सामन्यात दुसऱया स्लीपमध्ये तैनात विराटने शमीच्या गोलंदाजीवर बवूमाचा झेल घेतला, तो त्याच्यासाठी 100 वा बळी ठरला. यष्टीरक्षकाशिवाय अन्य कोणत्याही क्षेत्ररक्षकाने हा माईलस्टोन साजरा करणारा विराट सहावा भारतीय आहे.









