बीरभूम / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमधील बीरभूम जिल्हय़ाच्या रामपूरहाट येथे काही दिवसांपूर्वी झालेल्या जळीत कांडात 40 जणांचा हात होता, असे सीबीआयच्या प्राथमिक चौकशीत आढळले आहे. या जळीत कांडात 8 जणांना जिवंत जाळून ठार मारण्यात आले होते. कोलकाता उच्च न्यायालयाने याची चौकशी सीबीआयकडे देण्याचा आदेश दिला होता. त्यानुसार सीबीआय चौकशी करीत आहे.
हे जळीत होत असताना पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली, असा आरोप दंगलपिडीतांनी केला होता. त्यामुळे सीबीआयने बीरभूम जिल्हय़ाच्या काही पोलिस अधिकाऱयांचीही झाडाझडती घेतली होती. मुस्लीमांच्याच दोन गटांमध्ये ही दंगल झाली होती, असे स्पष्ट झाले आहे. आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली असून प्रत्यक्ष जाळपोळ करणाऱया 40 जणांनाही लवकरच गजाआड केले जाणार आहे. सीबीआयने दंगलखोरांची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न चालविले आहेत.
रामपूरहाट गावाचे प्रभारी पोलीस इन्स्पेक्टर त्रिदीप प्रामाणिक हे सध्या चौकशीच्या घेऱयात आहेत. त्याचप्रमाणे जिल्ह्य़ाच्या इतर प्रमुख पोलीस अधिकाऱयांनाही सीबीआयकडून प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र, सध्या सीबीआयने या भीषण जळीतकांडाची कारणे शोधून काढण्याला प्राधान्य दिले आहे. ट्रक्सच्या लूटमारीच्या स्पर्धेतून हे हत्याकांड घडले होते, असेही उघड झाले आहे.
प्रथम मारहाण, नंतर आग
या जळीतात बळी गेलेल्यांचा गुन्हावैद्यकीय अहवाल सादर करण्यात आला आहे. त्यानुसार जाळलेल्या व्यक्तींना प्रथम बेदम मारहाण करण्यात आली होती. नंतर त्यांना एका घरात कोंडून त्या घराला आग लावण्यात आली होती. हे हत्याकांड हेतुपुरस्सर करण्यात आले होते, हेही स्पष्ट झाले आहे.









