दहावी, अकरावी निकालाच्या आधारे केले मूल्यमापन

प्रतिनिधी /बेळगाव
पदवीपूर्व शिक्षण विभागाकडून मंगळवारी सायंकाळी 4 वा. बारावीचा निकाल जाहीर करण्यात आला. यावषी परीक्षाच न झाल्याने मागील परीक्षांच्या मूल्यांकनाच्या साहाय्याने निकाल देण्यात आला. यामुळे यावषी जिल्हय़ाचा निकाल पहिल्यांदाच 100 टक्के लागला. कोरोनामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्याने सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले असले तरी त्यांना पदवी प्रवेशासाठी आता तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
पीयूसी द्वितीय वर्षाची परीक्षा दरवषी मार्चमध्ये घेतली जाते. परंतु यावषी कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात आली. एप्रिलमध्ये कोरोनाचा संसर्ग अधिकच वाढल्याने राज्य सरकारने परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेतला.
परीक्षा जरी रद्द झाली असली तरी दहावी, अकरावी तसेच अंतर्गत मूल्यमापनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा निकाल लावण्याचा निर्णय पदवीपूर्व विभागाने घेतला. मागील काही दिवसांपासून मूल्यमापनाचे काम सुरू होते. हे काम पूर्ण होताच मंगळवारी निकाल जाहीर करण्यात आला.
यावषी बेळगाव जिल्हय़ात एकूण 22 हजार 383 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. यातील 19 हजार 278 फ्रेशर्स तर 3 हजार 105 विद्यार्थी रिपिटर होते. मागील काही वर्षांपासून बारावीची परीक्षा पास होऊ इच्छिणाऱया रिपिटर्सना ही परीक्षा वरदान ठरली. परीक्षेचे फॉर्म भरलेले सर्वच विद्यार्थी पास झाले आहेत. त्यामुळे या विद्यार्थ्यांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
साक्षी धोंडिबा पाटील (विद्यार्थीनी)
मागील शैक्षणिक वर्षात कोरोनामुळे ऑनलाईन क्लास झाले. कोरोना कमी झाल्यानंतर काही प्रमाणात ऑफलाईन देखील वर्ग चालले. परंतु कोरोनामुळे परीक्षेच्या आधी दडपण होते. बारावीच्या गुणांवरच पुढील भवितव्य अवलंबून असल्याने निकाल कधी लागेल याची चिंता होती. दहावी, अकरावी तसेच अंतर्गत गुणांमुळे मला 99 टक्के गुण मिळाले असून, मी यात समाधानी आहे असे तिने तरुण भारतशी बोलताना सांगितले.
निकाल वाढला परंतु पुढील प्रवेशाचे काय?
इतिहासात पहिल्यांदाच पीयुसीचा निकाल 100 टक्के लागला आहे. ज्यांना पास होण्याची आशाही नव्हती ते विद्यार्थी 60 ते 70 टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहेत. 100 टक्के निकाल लागल्याचा आनंद असला तरी पुढील प्रवेशाच्या डोकेदुखीत वाढ होणार आहे. प्रवेश नेमका कोणाला द्यावा हा प्रश्न या पुढील काळात उच्च शिक्षण देणाऱया संस्थांसमोर असणार आहे. त्यामुळे वाढलेला निकाल गुणवत्तेत तग धरून राहिल का? असा सवाल केला जात आहे.









