अनगोळमध्ये मोटारसायकली चोरीचे प्रकार वाढल्याने चिंता
प्रतिनिधी /बेळगाव
अनगोळ परिसरात दुचाकी चोरटय़ांनी अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. गेल्या 15 दिवसांमध्ये सहा दुचाकींची चोरी झाल्यामुळे अनगोळ परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. घरासमोर पार्क केलेल्या या दुचाकी चोरटे लांबवत आहेत. यामागे एखादी सराईत टोळी कार्यरत असून पोलिसांनी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
बाबले गल्ली आणि नाथ पै नगर येथून किमती दुचाकी चोरल्याचे मंगळवारी उघडकीस आले. प्रशांत देवेंद्र सुरुतेकर यांनी केए 22 ईएल 8985 क्रमांकाची करिझ्मा दुचाकी घरासमोर पार्क केली होती. रात्रीच्या वेळी चोरटय़ांनी ती लांबविली आहे. विकास विजय तानवडे यांनी यामाहा आर-1-5 केए 22 ईएच 3658 ही किमती दुचाकी पार्क केली होती. तीही चोरटय़ांनी लांबविली आहे.
अनगोळमध्ये घरांसमोरच अनेक जण दुचाकी पार्क करत असतात. चोरटे रात्रीच्या वेळी दुचाकी लांबवत आहेत. त्यामुळे या चोरटय़ांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अनगोळ परिसरातून होत आहे.









