बेळगाव
कर्नाटक लोकसेवा आयोगाच्या ग्रुप ए, ग्रुप बीसह विविध परीक्षा दि. 30 जुलै ते 1 ऑगस्टपर्यंत होणार आहेत. बेळगाव येथील चार परीक्षा केंद्रांवर परीक्षा होणार असून या पार्श्वभूमीवर पोलीस उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांनी केंद्रांबाहेर जमावबंदीचा आदेश जारी केला आहे.
दि. 30, 31 जुलै व 1 ऑगस्ट रोजी भाषा व स्पर्धात्मक परीक्षा होणार आहेत. बेळगाव येथील मराठी विद्यानिकेतन, उषाताई गोगटे गर्ल्स हायस्कूल, महिला विद्यालय इंग्रजी मेडीयम स्कूल, मॉडेल इंग्रजी मेडीयम स्कूल-बी. के. मॉडेल कॅम्पस् या येथे या परीक्षा होणार आहेत.
परीक्षेच्या काळात या तिन्ही दिवशी सीआरपीसी कलम 20 व 144 अन्वये परीक्षा केंदांबाहेर जमावबंदीचा आदेश जारी करण्यात आला आहे. सकाळी 9 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रांपासून 200 मीटर अंतरापर्यंत जमावबंदी असणार आहे.
केवळ परीक्षार्थी, अधिकारी, कर्मचारी व शिक्षण खात्याच्या अधिकाऱयांनाच या केंद्रांत प्रवेश असणार आहे. केंद्राजवळची झेरॉक्स सेंटर, सायबर कॅफे बंद करावी लागणार आहेत. या आदेशाचे उल्लंघन करणाऱयांवर कारवाई करण्याचा इशाराही पोलीस उपायुक्तांनी दिला आहे.









