सेन्सेक्समध्ये 154 तर निफ्टीत 44 अंकांची वाढ
वृत्तसंस्था/ मुंबई
सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या आधारावर भारतीय शेअर बाजाराने सोमवारी दमदार कामगिरी नोंदवली आहे. जागतिक गुंतवणूकीचा ओघही बाजारात मजबुती राखण्यासाठी उपयोगाचा ठरला असून या बळावर सेन्सेक्स, निफ्टी निर्देशांकाने नवा विक्रम नोंदवला आहे.
सेन्सेक्स सोमवारी 154 अंकांच्या वाढीसह 46,253.46 वर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 44 अंकांच्या वाढीसह 13,558.15 वर बंद झाला. सोमवारी लिस्टींग दिवशी भरघोस प्रतिसादासह बर्गर किंग इंडियाच्या समभागांनी 131 टक्क्यांची उसळी घेतल्याचे दिसून आले. सोमवारी दिवसभराच्या व्यवहारात एकावेळी सेन्सेक्स निर्देशांकाने 46 हजार 373 चा टप्पा तर निफ्टीनेही 13 हजार 597 अंकांची सर्वोच्च पातळी गाठली होती.
या कंपन्या तेजीत…
आयसीआयसी बँक, एल अँड टी, ओएनजीसी व टीसीएस यांच्या कामगिरीच्या जोरावर सेन्सेक्सने फायदा उठवला आहे. ओएनजीसीचे समभाग 5 टक्के, लार्सन अँड टुब्रो व सिप्ला यांचे समभाग 4 टक्के वाढल्याचे दिसून आले. यासोबत एनटीपीसी, आयसीआयसीआय बँक, सन फार्मा, एचसीएल टेक, टायटन आणि कोटक बँकेचे समभागही तेजीत दिसून आले. तर दुसरीकडे एचडीएफसी बँक, महिंद्रा आणि महिंद्रा, बजाज ऑटो व रिलायन्स इंडस्ट्रिज या कंपन्या मात्र नुकसानीत राहिल्या होत्या.
आशियाई बाजारात तेजी
सोमवारी आशियाई बाजार तेजीचा सूर पकडन होते. इतर आशियाई बाजारांचा विचार करता शांघाई कम्पोझीट, जपानचा निक्की तेजीत राहिला तर हाँगकाँगचा हँगसेंग आणि दक्षिण कोरीयातील कोस्पी बाजाराने घसरण अनुभवली. युरोपियन बाजार सुरूवातीच्या सत्रात लाभात होते. ब्रिटन आणि अमेरिकेत कोरोनावरील लसीकरणाला सुरूवात झाल्याचा सकारात्मक कल बाजारावर दिसला.









