किराणा दुकाने, एपीएमसी दुपारी 12 पर्यंत सुरू- सरकारकडून मार्गसूचीत बदल
प्रतिनिधी/ बेंगळूर
कोरोना नियंत्रणासाठी राज्य सरकारने मार्गसूचीत पुन्हा बदल केला असून राज्यात रविवारपासूनच बाजारपेठेत भाजीपाला विक्री, आठवडी बाजार बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. यावर पर्याय म्हणून भाजीपाला, फळांची विक्री हातगाडीवरून गल्लोगल्लीत विक्री करता येणार आहे. त्यासाठी सकाळी 6 ते सायंकाळी 6 पर्यंत वेळ निश्चित करण्यात आली आहे. दूध विक्रीचे बूथही सायंकाळी 6 पर्यंत सुरू ठेवता येणार आहे. किराणा दुकाने, एपीएमसी सकाळी 6 ते दुपारी 12 पर्यंत सुरू ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे.
राज्य सरकारने मंगळवारी रात्री 9 पासून 14 दिवसांकरिता क्लोजडाऊन घोषित केले होते. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता उर्वरित सर्व क्षेत्रांवर निर्बंध घातले होते. सकाळी 6 ते 10 या कालावधीतच बाजारपेठा सुरू करण्याची मुभा दिली होती. मात्र, भाजीपाल्याच्या बाजारपेठांमध्ये होणाऱया गर्दीमुळे संसर्ग वाढीचा धोका अधिक असल्याने सरकारने शनिवारी मार्गसूचीत बदल केला आहे. राज्य सरकारचे मुख्य सचिव आणि राज्य आपत्ती नियंत्रण प्राधिकरण कार्यकारी समितीचे सदस्य एन. मंजुनाथ प्रसाद यांनी हा आदेश दिला आहे.
सरकारच्या नव्या आदेशानुसार भाजीपाल्याच्या बाजारपेठा पूर्णपणे बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाला, फळे विक्री, जीवनावश्यक वस्तूंची होणार नाही. त्याऐवजी सायंकाळी 6 पर्यंत हातगाडीवरून दारादारात जाऊन भाजी, फळे व इतर जीवनावश्यक वस्तूंची विक्री करण्यास परवानगी दिली आहे.
नागरिकांच्या सोयीकरिता किराणा दुकाने आणि एपीएमसी सकाळी 6 ते दुपारी 12 या कालावधीत सुरू ठेवता येणार आहेत. तसेच दुग्धोत्पादकाच्या अनकुलतेचाही विचार करून दूध विक्रीचे बूथ सायंकाळी 6 पर्यंत सुरू ठेवण्याची सूचना देण्यात आली आहे. हातगाडीवर विक्री होणाऱया भाजी, फळांसाठी ज्यादा दर न आकारता बाजारपेठेतील दरानेच विक्री करावी. यावेळी देखील कोविड मार्गसूचीनुसार सुरक्षा नियमांचे पालन करणे सक्तीचे आहे, असे सरकारने आदेशात म्हटले आहे.









