विक्रमी वसुलीमुळे अर्थव्यवस्थेला दिलासा- सलग सातव्या महिन्यात ओलांडला 1 लाख कोटींचा आकडा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
देशात कोरोनामुळे अनेक राज्यात लॉकडाऊन लावण्यात आले असतानाही एप्रिल महिन्यातील जीएसटी करसंकलनाने विक्रमी आकडा गाठला आहे. एप्रिल 2021 या महिन्यात एकूण 1 लाख 41 हजार 384 लाख कोटींचा जीएसटी मिळाला आहे. नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या महिन्यात विक्रमी जीएसटी कलेक्शनची नोंद झाली आहे. सलग सातव्या महिन्यात 1 लाख कोटीच्या वर जीएसटी जमा झाल्याने सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. 2017 मध्ये जीएसटी लागू झाल्यानंतर हे सर्वात विक्रमी उत्पन्न आहे. तसेच मागील सलग सात महिन्यांमध्ये एक लाख कोटींहून अधिक करसंकलन झाल्याची नोंद झाल्याची माहिती अर्थ मंत्रालयाकडून देण्यात आली.
देशात जीएसटी लागू झाल्यापासून आतापर्यंतचा सर्वाधिक जीएसटी आहे. या जीएसटीत केंद्राचा 27 हजार 837 कोटी, राज्याचा 35 हजार 621 कोटी, एकीकृत जीएसटी 68 हजार 481 कोटी आहे. त्यात उपकर 9 हजार 445 कोटींचा आहे. एकंदर 1 लाख 41 हजार 384 कोटी रुपये इतकी रक्कम एप्रिल महिन्यात जीएसटीपोटी जमा झाली आहे. यापूर्वी मार्च महिन्यात 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.
कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येऊ लागल्यानंतर जीएसटीच्या वसुलीत वाढ झाली होती. मार्च महिन्यापूर्वीही गेल्या सहा महिन्यात सातत्याने 1 लाख कोटींहून अधिक कर जमा होत आहे. त्यानुसार ऑक्टोबर 2020 मध्ये 1 लाख 05 हजार 155 कोटी, नोव्हेंबर 2020 मध्ये 1 लाख 04 हजार 963 कोटी, डिसेंबर 2020 मध्ये 1 लाख 15 हजार 174 कोटी, जानेवारी 2021 मध्ये 1 लाख 19 हजार 847 कोटी, फेब्रुवारी 2021 मध्ये 1 लाख 13 हजार 143 कोटी तर मार्च 2021 मध्ये 1 लाख 23 हजार 902 कोटींचा जीएसटी वसूल करण्यात आला होता.









