वृत्तसंस्था/मुंबई
सय्यद मुश्ताक अली करंडक टी-20 लीग क्रिकेट स्पर्धेत बलाढय़ मुंबई संघाला सलग चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले. या स्पर्धेतील मुंबई संघाची ही सर्वात निकृष्ट कामगिरी असून नवा निवड समिती प्रमुख तसेच भारताचा माजी वेगवान गोलंदाज सलील अंकोलाला याची गंभीरपणे दखल घ्यावी लागेल. वानखेडे स्टेडियमवर इ गटातील झालेल्या सामन्यात पाँडिचेरीने मुंबईचा 6 गडय़ांनी पराभव केला.
बीसीसीआयच्या कोणत्याही स्पर्धेत प्रथमच मुंबई संघाला पाँडिचेरीकडून हार पत्करावी लागली आहे. गेल्यावर्षी आंध्रमध्ये झालेल्या निमंत्रितांच्या स्पर्धेत मुंबईला पाँडिचेरीकडून पराभव पत्करावा लागला होता. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यात प्रथम फलंदाजी करताना मुंबईचा डाव 19 षटकांत 94 धावांत आटोपला. त्यानंतर पाँडिचेरीने 4 बाद 95 धावा जमवित विजय मिळविला.
मुंबईच्या डावात शिवम दुबेने 28 तर आकाश पारकरने 20, तरेने 3, जैस्वालने 15, कर्णधार सुर्यकुमार यादवने 8, सिद्धेश लाडने 2 धावा जमविल्या. सुचित नाईकला खाते उघडता आले नाही. मुंबईचा डाव 19 षटकांत आटोपला. पाँडिचेरी संघातून खेळणारा 41 वर्षीय वयस्कर वेगवान गोलंदाज शांता मूर्तीने 20 धावांत 5 गडी बाद केले. त्यानंतर पाँडिचेरीने 4 बाद 95 धावा जमविल्या. पाँडिचेरी संघातील एस. कार्तिकने 26 तर जॅक्सनने 24 धावा जमविल्या. मुंबईतर्फे दुबेने 8 धावांत 2 बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक ः मुंबई 19 षटकांत सर्वबाद 94 (शिवम दुबे 28, आकाश पारकर 20, एस मूर्ती 5-20), पाँडेचेरी 4 बाद 95 (एस. कार्तिक 26, जॅक्सन 24, दुबे 2-8).









