शाहूपुरी पोलिसांची कारवाई : मोबाईल शॉपी चालकास मागितली खंडणी
प्रतिनिधी/ सातारा
शाहू क्रीडा संकुलातील एका मोबाईल शॉपी चालकाच्या दुकानात जावून तुला दुकान चालवयाचे असेल तर मला तीन लाख रुपयांची खंडणी द्यावी लागेल, अशी धमकी दिली. पैसे देण्यास नकार दिल्यावर दुकानातील महिला कर्मचाऱयासह इतर कर्मचाऱयांना शिवीगाळ केल्याप्रकरणी सराईत गुंड दत्ता उत्तम घाडगे (रा. दौलतनगर, करंजे, सातारा) याला शाहूपुरी पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 16 रोजी 5 ते 5.30 वाजण्याच्या सुमारास भु-विकास चौकातील शाहू क्रीडा संकुलातील बाहेरील गाळ्यामध्ये असणाऱया एस. एस मोबाईल शॉपीमध्ये जाऊन दत्ता उत्तम घाडगे यातील तक्रारदार शॉपीचालक मयूर प्रदीप भणगे (वय 25, रा. राजसपुरा पेठ, सातारा) यांना दुकान चालवयाचे असेल तर मला तीन लाख रुपये दे, अशी मागणी केली.
यावेळी भणगे यांनी पैसे देण्यास नकार दिल्यावर दत्ता घाडगे याने दुकानात धुडगुस घालण्यास सुरुवात केली. त्याने भणगे यांच्याबरोबरच दुकानातील अकाऊन्टंट तेजस्विनी रणवरे व अन्य कामगारांना शिवीगाळ, दमदाटी करत दहशत निर्माण केली. हा प्रकार गंभीर असल्याने मोबाईल शॉपीचे मालक मयुर प्रदीप भणगे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात धाव घेतली व तक्रार दिली. शाहूपुरी पोलिसांनी तातडीने कारवाई करत दत्ता घाडगे याला अटक केली आहे. या गुन्हय़ाचा पुढील तपास हवालदार हिंमत दबडे-पाटील करत आहेत.
दरम्यान, काही दिवसांपूर्वीच दत्ता घाडगे याने भू विकास बँकेच्या चौकात रात्रीच्या वेळी दारु पिवून धुडगुस घातला होता. त्यावेळी नागरिकांनी तक्रार केल्यानंतर सार्वजनिक शांततेचा भंग केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी घाडगे याला अटक केली होती. मात्र, त्यानंतरही त्याचे उद्योग पुन्हा सुरु असून त्याच्यावरील तडीपारीचा प्रस्ताव दाखल असताना देखील तडीपार का केले जात नाही, असा सवाल शाहू क्रीडा संकुलातील व्यावसायिकांसह, परिसरातील नागरिकांना पडला आहे.








