54 दिवसांत केवळ एकदाच प्रचारासाठी पोहोचले
कोरोनामुळे बिघडती स्थिती पाहता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी बंगालमधील स्वतःच्या सर्व प्रचारसभा रद्द केल्या आहेत. आतापर्यंतच्या 54 दिवसांच्या निवडणूक प्रचारात राहुल केवळ एकदाच प्रचारासाठी बंगालमध्ये पोहोचले आणि ते देखील चौथ्या टप्प्यानंतर. राहुल यांनी अन्य राजकीय पक्षांनाही प्रचारसभा रद्द करण्याचे आवाहन केले आहे.
कोरोनाची स्थिती पाहता पश्चिम बंगालमधील माझ्या सर्व प्रचारसभा स्थगित करत आहे. सद्यस्थितीत मोठय़ा जाहीरसभांच्या आयोजनाच्या परिणामांचा विचार करावा असा सल्ला सर्वच राजकीय नेत्यांना देत असल्याचे राहुल यांनी म्हटले आहे.
लोकांची सुरक्षा विचारात घेत उर्वरित 3 टप्प्यांमधील निवडणूक एकाचवेळी घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला केले आहे. 8 टप्प्यांमधील निवडणुकीला आम्ही नेहमीच विरोध केला आहे. कोरोनाच्या काळात राज्यात दीर्घ काळापर्यंत निवडणूक चालावी असे आमचे मत नव्हते. स्थिती बिघडत असल्याने आयोगाने पुनर्विचार करावा असे ममतांनी म्हटले आहे.
5 राज्यांमध्ये आता केवळ पश्चिम बंगालमध्येच तीन टप्प्यांमधील मतदान शिल्लक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी प्रचारसभा घेत आहेत. या सभांमध्ये लाखोंची गर्दी होत आहे. 90 टक्के लोक मास्क वापरत नसल्याचे दिसून आले आहे. सोशल डिस्टन्सिंगचा तर फज्जाच उडतो. राज्यात शनिवारी 7,713 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. हा आकडा उच्चांकी ठरला आहे. तरीही सभांमध्ये सामील होताना बेजबाबदारपणा दिसून येत आहे.









