आपल्या देशात स्वतंत्र मत मांडण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे त्यामुळे काही लोक महाभारत, रामायण, भागवतसारख्या पवित्र ग्रंथावर भाकड कथा, कपोलकल्पित कथा असल्याचा प्रचार करतात. सामान्य दृष्टिकोनातून पाहिल्यास ते खरे असल्याचे प्रतीत होते, कारण रामायणातील अनेक गोष्टी सध्याच्या आपल्या जाणिवेपलीकडील आहेत. उदाहरणार्थ, रावणाची दहा डोकी आणि वीस बाहू, रावणाची सोनेरी लंका, वानर रूपातील हनुमान, सुग्रीव आदींद्वारा मानवी भाषा बोलणे, हनुमंतांनी एका उडीत समुद्र पार करणे, श्रीरामाद्वारे काही दिवसात वानरांच्या साहाय्याने समुद्रावर तरंगणारा विशाल सेतू निर्माण करणे इत्यादी. या कथा वाचल्यावर कधी कधी मनात शंका निर्माण होते की या कथा सत्य आहेत की कल्पना? लोकांचे मनोरंजन करण्यासाठी या कथांची रचना केली असेल का? लोकांनी घाबरून नीतिमूल्यांचे पालन करावे यासाठी या कथांची रचना केली असेल का?
याचे पहिले आणि मूळ कारण आहे की अशा लोकांनी पाश्चात्यांनी वैदिक संस्कृतीचा ऱहास व्हावा व भारतातील वैदिक संस्कृतीबद्दल लोकांच्या मनात गैरसमजुती निर्माण व्हाव्यात या दृष्टिकोनातून लिहिलेले पवित्र ग्रंथ याचा अभ्यास केला. त्यांनी शंकराचार्य, रामानुजाचार्य, मध्वाचार्य, संत तुकाराम यांच्यासारख्या अधिकारी व्यक्तीकडून अथवा त्यांच्या प्रतिनिधींकडून हे पवित्र ग्रंथ समजून घेतले नाहीत. याचा परिणाम असा झाला की आपल्या देशाचाच नव्हे तर संपूर्ण ब्रह्मांडाचा इतिहास असणारे आपले वैदिक ग्रंथ जे ब्रिटिश आपल्यावर राज्य करण्यासाठी येण्याअगोदर प्रत्येक गुरुकुलामध्ये शिकवले जायचे, प्रत्येक घराघरामध्ये वाचले जायचे त्यावर आपण संशय घेऊ लागलो. आपली खरी समस्या ही आहे की आपल्याला या अनंत ब्रह्मांडातील एका छोटय़ाशा पृथ्वीवरील अगदी छोटासा अनुभव आहे. आपल्या सीमित अनुभवाद्वारे आपण संपूर्ण ब्रह्मांडातील रहस्य समजू शकत नाही. नीट निरीक्षण केल्यास आपल्याला समजेल की मागील युगातील लोकांपेक्षा सध्याच्या लोकांची बुद्धी, शारीरिक तसेच मनाची शक्ती क्षीण होत चालली आहे. त्यामुळे काय शक्मय आहे आणि काय अशक्मय आहे याबाबतची आपली धारणादेखील अत्यंत सीमित आहे. पूर्वीच्या काळातील लोक हे अत्यंत बुद्धिमान, शक्तिमान, चारित्र्यवान होते, त्यांचे आपल्या मनावर आणि इंद्रियावर पूर्ण नियंत्रण होते. ते निस्वार्थी होते आणि लोकांना फसविण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये नव्हती. काहीतरी नवीन प्रयोग करून समाजामध्ये प्रति÷ा प्राप्त करण्यासाठी ते धडपड करत नसत. प्रत्यक्ष भगवंतापासून चालत आलेला वैदिक संस्कृतीचा मार्ग आणि त्याचे ज्ञान प्रामाणिक गुरुशिष्य परंपरेतून आलेल्या शुद्ध चारित्र्याच्या गुरुकडूनच ते शिकत असत आणि प्रामुख्याने हीच लक्षणे रामायण आणि महाभारत समजण्यासाठी आवश्यक आहेत. आपल्यालाही महाभारत आणि रामायण समजून घेण्यासाठी ही लक्षणे आत्मसात करणे आवश्यक आहे तरच आपल्याला हे ग्रंथ कपोलकल्पित कथा नसून आपल्या देशाचा देदीप्यमान इतिहास आहे हे कळेल. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांनी लहानपणीच या दिव्य ग्रंथातून प्रेरणा घेतली आणि संत तुकाराम महाराजांसारख्या शुद्ध अंतःकरणाच्या संतांनी स्वतःची मते न सांगता रामायण आणि महाभारत यातील दिव्य ज्ञानाचे प्रथम आपल्या जीवनात पालन केले आणि लोककल्याणार्थ त्याचा प्रचारही केला. त्यांच्यासारखाच नम्र भाव आपल्यामध्ये असेल आणि त्यांनी सांगितलेला राम आणि कृष्ण यांच्या पवित्र नामाचा जप करून आपले अंतःकरण आणि मन शुद्ध झाले असेल तर रामायण, महाभारतसारखे ग्रंथ आपल्याला सहजपणे जसे आहेत तसे समजतील. संत तुकाराममहाराज एका अभंगात रामायण समजून घेण्याची पात्रता, आवश्यक साधना आणि अंतःकरणातील भाव प्रकट करताना म्हणतात, मी तो अल्पमतिहीन । काय वर्णू तुझे गुण । उदकीं तारिले पाषाण । हे महिमान नामाचे ।।1।। नाम चांगले चांगले । माझे कंठी राहो भले। कापिकूळ उद्धरिले । मुक्त केले राक्षसा ।।2।। द्रोणागिरी कपिहाती । आणविला सीतापती । थोर केली ख्याती । भरतभेटी समयी ।।3।। शिळा होती मनुष्य झाली । थोर कीर्ती वाखाणिली । लंका दहन केली । हनुमंते काशाने ।।4।। राम जानकीजीवन । योगियांचे निजध्यान । राम राजीवलोचन । तुका चरण वंदितो ।।5।। अर्थात मी तर अल्पमती हीन आहे, श्रीरामा आपले गुणवर्णन मी काय करू शकणार? तुझ्या नामाचा महिमा असा आहे की, त्यामुळे पाषाण पाण्यावर तारिले गेले. ते नाम चांगले, फार चांगले आहे तेच माझ्या कंठात नित्य राहो. त्यामुळेच वानर कुळाचा उद्धार झाला आणि राक्षसांना मुक्त केले. मारुतीरायांच्या हातून रामाने द्रोणागिरी पर्वत आणविला, बंधू भरत भेट प्रसिद्ध केली. अहिल्या ही शापामुळे शिळा होऊन पडली होती ती रामाच्या चरणस्पर्शाने पुन्हा मुक्त झाली, लंकेचे दहन हनुमंताने केले हे सामर्थ्य रामनामाशिवाय दुसऱया कशात आहे? तुकाराम महाराज म्हणतात, जो जानकीचे जीवन, योगियांचे निजध्यान, ज्याचे नेत्र कमळासारखे आहेत, त्या प्रभू श्रीरामांच्या चरणावर मी डोके ठेवून नमस्कार करतो. रावणासारखा ब्राह्मणपुत्र, अत्यंत बुद्धिमान, शक्तिशाली, व्यक्ती त्याच्या अनियंत्रित इंद्रिय व भोगविलासी वृत्तीमुळे प्रभू श्रीराम त्याच्यासमोर असूनदेखील त्यांना समजू शकला नाही मग कलियुगातील आपल्यासारख्या अल्पमती, इंद्रियपराधीन, भोगवृतींनी मलिन झालेल्या मन आणि बुद्धीने सीताराम आणि त्यांच्या हनुमंत, भरत, बिभीषण यासारख्या भक्तांच्या दिव्य लीला कशा समजणार? सीतादेवी स्वतः लक्ष्मी आहे आणि कोणत्याही जिवाने तिचा उपभोग घेण्याचा विचारदेखील करू नये. आपण तिचे स्वामी श्रीरामचंद्राबरोबर सेवापूजा केली पाहिजे. रावणासारख्या भौतिकवादी आणि विलासी व्यक्ती हे महान सत्य समजू शकले नाहीत. म्हणून सीतादेवीची सेवा करण्याऐवजी तिला श्रीरामापासून हिरावून नेऊन स्वतःच्या विनाशाला निमंत्रण दिले.
भोगविलासी आणि ऐश्वर्याच्या मागे धावणाऱया लोकांनी रामायणातून शिकवण घ्यावी की जर आपण भगवंताच्या सत्तेला बहिष्कृत करून त्यांच्या शक्ती किंवा प्रकृतीचा भोग घेण्याचा प्रयत्न केल्यास आपणदेखील एका दृष्टीने रावणाचीच मनोवृत्ती धारण केली आहे. रावण भौतिकदृष्टीने अतिशय शक्तिशाली होता, त्याने आपली संपूर्ण लंकानगरी सोन्याने मढविली होती, तरीही तो भगवान श्रीरामचंद्रांची भगवत्ता समजू शकला नाही आणि त्याने त्यांची धर्मपत्नी सीतादेवीचे अपहरण करण्याचे दुःसाहस केले. परिणामतः त्याचा नाश तर झालाच त्याबरोबर त्याचे संपूर्ण ऐश्वर्य, शक्ती, साम्राज्याचादेखील सर्वनाश झाला.
आधुनिक आतंकवाद्याप्रमाणे रावणाने सीतेचा भोग घेण्याची एक कुत्सित योजना बनविली आणि सुशील ब्राह्मणाचा वेष धारण करून भिक्षा मागण्यासाठी पंचवटीत (आजचे नाशिक शहर) पोहोचला. बाहेरून ब्राह्मण दिसणाऱया रावणाच्या मनात नीच वृत्तीची इच्छा होती. आतून रावण आणि बाहेरून सुसंस्कृत दिसणारे लोक आजही समाजामध्ये पसरलेले आहेत. कदाचित पहिल्यापेक्षा अधिक संख्येने आणि अधिक नीच वृत्तीचे. सारांशाने सांगायचे झाल्यास रामायण, महाभारत आणि तत्सम वैदिक ग्रंथ हे आपल्या बुद्धीने समजणारे ज्ञान नाही. त्यासाठी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णापासून चालत आलेल्या गुरुशिष्य परंपरेतील हरिभक्तिपरायण शुद्ध वैष्णवांचा संग, नम्र भावना, नित्य राम कृष्ण नामस्मरण, निस्वार्थी शुद्ध अंतःकरण, भगवत्प्रेम हृदयामध्ये असणे आवश्यक आहे. अशा प्रामाणिक व्यक्तीच्या हृदयातच भगवंताच्या आणि त्याच्या शुद्ध भक्ताच्या कृपेने समस्त वैदिक ज्ञान प्रकाशित होते.
qqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqqवृंदावनदास








