गांधीनगर येथील फळ मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने कारवाईचा बडगा : मनपा कर्मचारी-पोलीस त्रास देत असल्याचा आरोप फेटाळला
प्रतिनिधी / बेळगाव
गांधीनगर येथील फळ मार्केटमध्ये गर्दी होत असल्याने कारवाईचा बडगा उगारण्यात आला होता. त्यामुळे मार्केटमधील व्यापाऱयांनी महापालिका आयुक्तांची भेट घेऊन मनपा कर्मचारी आणि पोलीस त्रास देत असल्याचा आरोप केला. मात्र, हा आरोप फेटाळत केवळ जीव रक्षणासाठी आम्हाला ही कारवाई करावी लागत आहे. सामाजिक अंतर ठेऊन व्यवसाय केल्यास प्रशासनाला काहीच हरकत नाही. त्याकरिता खुल्या मैदानात फळ मार्केट स्थलांतर करण्याचा प्रस्ताव महापालिका आयुक्त जगदीश के एच. यांनी फळ विपेत्यांसमोर ठेवला.
शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने दररोज शेकडो नागरिकांना कोरोनाची बाधा होत आहे. त्यामुळे शहरातील रुग्णालयात बेड मिळणे मुश्कील बनले आहे. सध्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आले आहे. पण अत्यावश्यक सेवा पुरविण्यासाठी सकाळी सहा ते दहा या वेळेत व्यवसाय करण्याकरिता मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे भाजी मार्केट, फळ मार्केट आणि धान्य मार्केट सुरू आहेत. मात्र, फळ मार्केटमध्ये कोणतेच नियम पाळण्यात येत नाहीत. सकाळच्या सत्रात फळ मार्केटमध्ये मोठय़ा प्रमाणात गर्दी होत आहे. फळ विपेते तसेच किरकोळ फळ खरेदीसाठी येणारे ग्राहक फळ मार्केटमध्ये गर्दी करत आहेत. त्यामुळे सामाजिक अंतर राखले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे. काही व्यापाऱयांच्या तसेच ग्राहकांच्या तोंडावर मास्क नसल्याचे आढळून आले. एकीकडे कोरोनामुळे जीव जात आहे तर दुसरीकडे सर्व नियम धाब्यावर बसवून व्यवसाय सुरू असल्याची परिस्थिती फळ मार्केटमध्ये दिसून येत आहे. त्यामुळे पोलीस प्रशासनाने व्यापाऱयांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. सकाळी नऊ वाजताच व्यवसाय बंद करण्याची सूचना फळ मार्केटमधील व्यापाऱयांना करण्यात येत आहे. मात्र, व्यावसायिकांना व्यवसाय करण्यास देण्यात येत नसल्याचा आरोप फळ विपेते करीत आहेत. दररोज सकाळी नऊ वाजता फळ मार्केट बंद करण्यात येत असल्याने या विरोधात फळ विपेत्यांनी मंगळवारी महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांची महापालिका कार्यालयात भेट घेतली. सकाळी 6 ते 10 या वेळेत व्यवसाय करीत असून महापालिकेचे कर्मचारी व पोलीस कर्मचारी व्यावसायिकांना त्रास देत असल्याचा आरोप केला. सामाजिक अंतर राखण्याच्या सूचना ग्राहकांना करीत आहोत पण त्याचे पालन केले जात नाही. त्यामुळे यामध्ये व्यावसायिकांचा दोष काय आहे, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला. काही किरकोळ व्यापारी मार्केटच्या प्रवेशद्वारावर बसून व्यवसाय करीत असल्याने त्या ठिकाणी गर्दी होत आहे. फळ मार्केटमधील व्यावसायिकांनी किरकोळ व्यापाऱयांना सूचना केली असता तुम्ही सांगणारे कोण, असा मुद्दा उपस्थित करीत आहेत. पण त्या व्यापाऱयांमुळेच जास्त गर्दी होत असल्याची तक्रार करण्यात आली. दिलेल्या वेळेत व्यवसाय करण्यासाठी सहकार्य करावे व फळ विपेत्यांवर कारवाई करू नये, अशी विनंती फळ विपेत्यांनी मनपा आयुक्तांकडे केली.
विपेत्यांचे म्हणणे ऐकून घेऊन महापालिका आयुक्तांनी फळ विपेत्यांचा आरोप फेटाळला. व्यवसाय करण्यास कोणतीच अडचण नाही. तुमच्या व्यवसायात बाधा आणण्यासाठी त्रास देत नसून केवळ जनतेचा जीव वाचविण्यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत. सामाजिक अंतर राखले जात नसल्याने भाजी मार्केट तीन ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. शहरातील भाजी मंडई बंद ठेऊन फिरता व्यापार करण्याची सूचना भाजी विपेते व फळ विपेत्यांना करण्यात आली आहे.पण फळ विपेत्यांनी केवळ व्यवसाय करण्याचा प्रयत्न चालविला आहे. व्यवसाय करा पण जनतेच्या जीवाशी खेळू नका, अशी सक्त ताकीद महापालिका आयुक्त जगदीश के. एच. यांनी व्यापाऱयांना केली.
नियमावलीचे पालन होत नाही
व्यवसाय करताना कोरोना नियमावलीचे पालन केले जात नसल्याचे आढळले आहे. सामाजिक अंतर राखणे आवश्यक आहे, पण फळ मार्केटमध्ये याचे कोणतेच गांभीर्य दिसत नाही. काही व्यापारी आणि ग्राहक मास्क घालत नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळेच ही कारवाई करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. तुम्ही नियमांचे पालन केल्यास त्रास देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. व्यवसाय करण्यासाठी व्यावसायिकांनी दुकानांसमोर मार्किंग केले नाही. गर्दी होत असल्यास ग्राहकांना सूचना केली जात नाही. त्यामुळेच फळ विपेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे, असे महापालिका आयुक्तांनी सांगितले. फळ मार्केटची जागा अपुरी असल्याने त्या ठिकाणी दुचाकी व चार चाकी वाहनांची तसेच ग्राहक-विपेत्यांची गर्दी होत आहे. अशातच माल ने-आण करणाऱया अवजड वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे कोरोना नियमांचे उल्लंघन होत आहे. फळ मार्केट खुल्या मैदानात स्थलांतर करून दुकानांसमोर मार्किंग करा. त्या ठिकाणी गर्दी होणार नाही. नियंत्रण करण्यासाठी मनपा आणि पोलीस प्रशासनाकडून सहकार्य करू, असा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी व्यावसायिकांसमोर ठेवला.
कोरोना नियमांचे पालन करून व्यवसाय करू. गर्दी टाळण्यासाठी बाजारात येणारी वाहने मार्केटबाहेर पार्क करण्यात येतील. गर्दी कमी झाली नसल्यास मैदानाचा शोध घेण्यात येईल. फळ मार्केट स्थलांतरासाठी दोन दिवसांचा अवधी विपेत्यांनी घेतला. यावेळी पोलीस अधिकारी, मनपाचे पर्यावरण साहाय्यक कार्यकारी अभियंता हणमंत कलादगी, पर्यावरण साहाय्यक अभियंते आदिलखान पठाण, अभियंत्या महादेवी आदींसह फळ विपेते उपस्थित होते.









