ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारतातील कोरोना लसीची कमतरता लक्षात घेता अमेरिकन फार्मा कंपनी ‘फायझर-बायोएनटेक’ने भारताला 5 कोटी डोस देण्याचे मान्य केले आहे. परंतु फायझरला केंद्र सरकारकडून नियमांमध्ये शिथिलता हवी आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फायझर-बायोएनटेकने अमेरिका, ब्रिटनसह अनेक देशांच्या सरकारकडून कायदेशीर संरक्षणाची हमी मागितली असून, आता फायझर हीच मागणी भारतात करत आहे. फायझरची लस घेतल्यानंतर कोणत्याही दुष्परिणामांबाबत कंपनीवर कायदेशीर कारवाई होऊ नये, अशी कंपनीची इच्छा आहे. त्यासाठी केंद्र सरकारला पुढे येऊन आपल्या नियमांमध्ये शिथिलता आणावी लागेल.
दरम्यान, फायझर येत्या जुलैमध्ये 1 कोटी, ऑगस्टमध्ये 1 कोटी, सप्टेंबरमध्ये 2 कोटी तर ऑक्टोबरमध्ये 1 कोटी असे एकूण 5 कोटी डोस देण्यास तयार आहे.









