सोशल मीडियामध्ये सरकारचा हस्तक्षेप लोकशाहीला घातक असल्याचा निर्वाळा
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोशल मीडिया कंपन्या आणि सरकारवर संसदेमध्ये गंभीर आरोप केले. सत्ताधाऱयांच्या संगनमताने सोशल मीडिया कंपन्यांचा गैरवापर होत असल्याचा दावा त्यांनी केला. सरकारच्या हस्तक्षेपामुळे देशातील परस्पर बंधुभाव बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीला धोका निर्माण करणारे असे प्रयत्न त्वरित थांबवले पाहिजेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी लोकशाहीप्रधान देशातील राजकारणात सोशल मीडियाच्या वाढत्या गैरवापराबाबत लोकसभेत चिंता व्यक्त केली. फेसबुकने सत्ताधारी पक्षाला साथ दिल्याचे वॉल स्ट्रीट जर्नलने आपल्या अहवालात नमूद केल्याचा दाखला त्यांनी यावेळी दिला. फेसबुकने स्वतःचे नियम मोडून सत्ताधारी पक्ष आणि सरकारची साथ दिली होती. चुकीच्या माहितीमुळे देशातील तरुण आणि ज्ये÷ नागरिकांमध्ये द्वेष निर्माण करण्याचे काम केले जात आहे. कंपनीला यासंबंधी पूर्ण जाणीव असूनही केवळ आपल्या फायद्यासाठी त्याचा वापर केला जात आहे, असे सोनिया गांधी यांनी लोकसभेत सांगितले.
भारताची लोकशाही आणि सामाजिक एकोपा बिघडवण्याचे काम फेसबुक, ट्विटर यासारख्या कंपन्या करत आहेत. त्यामुळे पुढील धोका लक्षात घेऊन त्यांनी सरकारला काही महत्त्वाच्या सूचना केल्या. जगातील सर्वात मोठय़ा लोकशाहीच्या निवडणुकीच्या राजकारणातून फेसबुक आणि इतर सोशल मीडिया दिग्गजांचा पद्धतशीर हस्तक्षेप आणि प्रभाव संपुष्टात आणावा. हे पक्षपाती राजकारणाच्या पलीकडे आहे, असे त्या पुढे म्हणाल्या.
राहुल गांधींचेही ट्विट…
काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी फेसबुक भाजपसाठी सोईस्कर भूमिका घेत असल्याची टीका ट्विटच्या माध्यमातून केली. तसेच सोशल मीडियाचा गैरवापर लोकशाहीसाठी वाईट असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यासंबंधी भाष्य करताना त्यांनी अल जजीरा या आंतरराष्ट्रीय माध्यमातील काही लेखांचे कात्रण आपल्या ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केले आहेत.









