बीपीएल मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धा

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
युनियन जिमखाना आयोजित बेळगाव प्रिमियर लीग मोहन मोरे चषक टी-20 क्रिकेट स्पर्धेत बुधवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघाने के. आर. शेट्टी संघाचा 3 गडय़ांनी तर साई स्पोर्ट्स हुबळी टायगर्स संघाने स्पोर्ट्स ऑन संघाचा 4 गडय़ांनी पराभव करून प्रत्येकी दोन गुण मिळविले. सुशांत कोवाडकर (ऍक्सेस), यश कळसण्णावर (साई) यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
जिमखाना मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात के. आर. शेट्टी संघाने 20 षटकात 5 बाद 174 धावा केल्या. वैष्णव संघमित्राने 4 षटकार 6 चौकारासह 45 चेंडूत 81, ओंकार वेर्णेकरने 3 षटकार 2 चौकारासह 46 तर प्रणय शेट्टीने 16 धावा केल्या. ऍक्सेसतर्फे प्रशांत होनगेकरने 40 धावात 2, ताहिर सराफ व हार्दिक ओझा यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना ऍक्सेस डेव्हलपर्स सीसीआय संघाने 19.4 षटकात 7 बाद 176 धावा केल्या. सुशांत कोवाडकरने 4 षटकार 3 चौकारासह 52, अभिषेक देसाईने 3 चौकारासह 37, झिनत एबीएमने 3 चौकारासह 31, माजीद मकानदारने 18 धावा केल्या. के. आर. शेट्टीतर्फे स्वयम अप्पण्णावर व पुनीत दीक्षित यांनी प्रत्येकी 28 धावात 2, अनंत माळवी व फरहान पाटील यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱया सामन्यात स्पोर्ट्स ऑन संघाने 19.1 षटकात सर्व बाद 108 धावा केल्या. रोहित देसाईने 2 षटकार 4 चौकारासह 49, आकाश कटांबळेने 1 षटकार 1 चौकारासह 19 तर आकाश पत्तारने 15 धावा केल्या. साई स्पोर्ट्सतर्फे स्वप्निल एळवेने 19 धावात 2, भरत गाडेकरने 21 धावात 2, डॉमनिक फर्नांडिस, राजेंद्र दंगण्णावर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना साई स्पोर्ट्स हुबळी संघाने 16.2 षटकात 6 बाद 110 धावा करून सामना 4 गडय़ांनी जिंकला. यश कळसण्णावरने 4 चौकारासह 36, डॉमनिक फर्नांडिसने 17 तर स्वप्निल एळवेने 13 धावा केल्या. स्पोर्ट्स ऑनतर्फे आकाश कटांबळेने 23 धावात 2, संकेत देसाईने 20 धावात 2 बळी टिपले.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे समिर केशकामत, गौरव कामत, संजय पोतदार यांच्या हस्ते सामनावीर सुशांत कोवाडकर, इम्पॅक्ट खेळाडू व सर्वाधिक षटकार वैष्णव संघमित्रा, उत्कृष्ट झेल ओंकार वेर्णेकर तर दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे सुशांत चव्हाण, संतोष अर्कसाली, सुधाकर पाटणकर यांच्या हस्ते सामनावीर यश कळसण्णावर, इम्पॅक्ट खेळाडू भरत गाडेकर, सर्वाधिक षटकार रोहित देसाई, उत्कृष्ट झेल आकाश पत्तार यांना चषक देवून गौरविण्यात आले.
गुरूवारचे सामने-अर्जुनवीर साई सोशल वि. सुपर एक्स्प्रेस युनियन जिमखाना स. 9 वा., विश्रुत स्ट्रायकर्स वि. स्पोर्ट्स ऑन दु. 1 वा.









