अध्यक्षाची निवड : नीमराना, जैसलमेरमध्ये आयोजन
वृत्तसंस्था/ जयपूर
नेतृत्व संकटाला तोंड देणाऱया काँग्रेस पक्षाची धुरा पुन्हा एकदा राहुल गांधी यांना सोपविली जाऊ शकते. राजस्थानात फेब्रुवारी महिन्यात काँग्रेसचे अधिवेशन आयोजित केले जाणार असल्याची चर्चा आहे. हे अधिवेशन नीमराना किंवा जैसलमेरमध्ये आयोजित होणार आहे. या अधिवेशनात राहुल गांधी यांना पुन्हा अध्यक्षपद देण्यात येणार आहे.
राहुल गांधी यापूर्वी 16 डिसेंबर 2017 पासून 10 ऑगस्ट 2019 पर्यंत काँग्रेस अध्यक्ष राहिले आहेत. काँग्रेस निवडणूक समितीने अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांना अधिवेशनाचे ठिकाण आणि वेळ निश्चित करण्याचे आवाहन केले आहे. याचबरोबर निवडणुकीत भाग घेणाऱया अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सदस्यांची यादी अंतिम करण्याचे कामही अखेरच्या टप्प्यात आहे.
पक्षाचे नेते गुलाम नबी आझाद यांनी पक्षाच्या कामकाजाच्या पद्धतीवर प्रश्न उपस्थित केले होते. पंचतारांकित संस्कृतीचा त्याग होईंपर्यंत कुठलीच निवडणूक जिंकता येणार नसल्याचे आझाद यांनी म्हटले हेते.
कृषी कायद्यांवर आक्रमक
काँग्रेस कृषी कायद्यांवरून आक्रमक झाला आहे. यापूर्वी दिल्लीत राहुल गांधी आणि प्रियंका वड्रा यांनी ठिकाणी निदर्शने केली होती. पंजाबमधील शेतकऱयांच्या आंदोलनातही काँग्रेसने भाग घेतला होता. काँग्रेसने कृषी कायद्यांवर पुस्तिका प्रसिद्ध करण्याचीही तयारी केली आहे. ही पुस्तिका अनेक भाषांमध्ये प्रसिद्ध होणार आहे.









