कंटेनरच्या पुढील चाकामध्ये सापडल्याने दहा मिटर फरफटत नेले : पाठीमागे बसलेली पत्नी गंभीर जखमी
प्रतिनिधी /फोंडा
फोंडा-पणजी महमार्गावरील फर्मागुडी येथील धोकादायक जीव्हीएम सर्कलजवळील वळणावर कंटेनरने दुचाकीचालकाला ठोकरल्याने दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला तर पाठीमागे बसलेली त्याची पत्नी गंभीर जखमी झाली आहे. अर्जुन लक्ष्मण नाईक (45, धावसीवाडी-पाल, वेगुर्ला-सिंधुदुर्ग, सध्या राहणारा कुकळय़े म्हार्दोळ) असे मयताचे नाव असून अनुष्का अर्जुन नाईक (32) असे जखमी पत्नीचे नाव आहे. सदर घटना काल शुक्रवारी रात्री सव्वा आठच्या सुमारास घडली.
फोंडा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मयत लक्ष्मण आपली दुचाकी एमएच 07 एए 1643 ने पत्नीसह फोंडा मार्केट येथून बाजारहाटीनंतर आपल्या कुकळय़े येथील राहत्या खोलीकडे परतीच्या वाटेवर असताना जीव्हीएम सर्कलजवळ हा अपघात घडला. जीव्हीएम सर्कलजवळ क्रॉस करण्याच्या पवित्र्यात असताना पाठीमागून आलेल्या अवजड कंटेनर जीए 08 व्ही 0652 ने ढवळी-फर्मागुडी बायपासमार्गे वळविताना दुचाकीचालकाला ठोकरले. कंटेनरच्या पुढील चाकात सापडलेल्या दुचाकीचालकाला सुमारे दहा मिटर फरफटत नेले. यात दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाला.
उपजिल्हा इस्पितळातील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तर जखमी पत्नीवर उपचार सुरू आहेत. मयताचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोमेकॉत पाठविण्यात आला आहे. फोंडा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला.
दोघा मुलींचे पितृछत्र हरपले..
मयत अर्जुन हा मागील काही वर्षापासून गोव्यात वास्तव्यास असून एका खासगी मालकाकडे इलेक्ट्रीशियन म्हणून कामाला होता. अत्यंत मनमिळावू स्वभावाचा असून आपल्या आमशेवाडा कुकळय़े म्हार्दोळ येथे भाडय़ाच्या खोलीत छोटेखानी किराणा दुकान चालवित होता. याकामी त्याला पत्नीची बहुमोल साथ लाभत होती, त्याचसंबंधी बाजाहटीसाठी अंडी व इतर साहित्य घेऊन फेंडय़ाहून खोलीकडे परतत असताना प्रुर काळाने त्याच्यावर झडप घातली. त्याच्या पश्चात पत्नी व दोन मुली असा परिवार आहे. यात चार वर्षाची एक मुलगी व दुसरी मोठी मुलगी मंगेशी येथील वागळे हायस्कूलात सातवीच्या वर्गात शिकत आहे. आई जखमी अवस्थेत तर पितृछत्र हरपल्याने लहान मुलावर बिकट परिस्थिती ओढावली आहे. घरमालकांनी दोघां मुलीची काळजी घेतली असून पत्नीच्या मूळगावी निरोप पाठविण्यात आला आहे.
याप्रकरणी कंटेनरचालक सागर दिना नाईक (45, पंचवाडी-शिरोडा) याच्याविरोधात निष्काळजीपणे वाहन हाकून मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी भां.दं.सं. 304 (ए), 338 व 279 कलमाखाली गुन्हा नोंदवून अटक केली आहे. उपनिरीक्षक नारायण पिंगे अधिक तपास करीत आहे.









