वृत्तसंस्था/ चेन्नई
भारताचा माजी आंतरराष्ट्रीय नेमबाज तसेच पिस्तुल नेमबाज प्रशिक्षक जसपाल राणाने टोकियो ऑलिम्पिकसाठी जाणाऱया भारतीय नेमबाज संघाला मार्गदर्शन करण्यासाठी पुढील महिन्यात क्रोएशियातील झाग्रेब येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे.
सध्या क्रोएशियात युरोपियन नेमबाजी स्पर्धा सुरू असून या स्पर्धेत भारताचे नेमबाज सहभागी झाले आहेत. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेपूर्वी भारतीय नेमबाजांना क्रोएशियात सराव प्रशिक्षणाची तरतूद केली आहे. भारतीय नेमबाज संघ क्रोएशियातून थेट टोकियो ऑलिम्पिकमध्ये दाखल होतील.
भारतीय नेमबाज प्रशिक्षक जसपाल राणा, समरेश जंग आणि व्यवस्थापक रोनक पंडित यांनी युरोपच्या दौऱयावर न जाण्याचा निर्णय सुरूवातीला घेतला होता. पण आता जसपाल राणा, समरेश जंग व रोनक पंडित हे क्रोएशियाच्या दौऱयावर जाणार असल्याची माहिती अखिल भारतीय रायफल संघटनेचे सचिव राजीव भाटिया यांनी दिली आहे. संघटनेतर्फे जसपाल राणाच्या क्रोएशिया दौऱयाची आखणी सुरू करण्यात आली आहे. भारतीय नेमबाज संघातील मनू भाकर, सौरभ वर्मा तसेच अन्य काही नवोदित नेमबाजांना जसपाल राणाचे मार्गदर्शन मिळणार आहे.









