न्यूयॉर्क –
वायुप्रदुषणासह धुम्रपानाने फुफ्फुसाला हानी पोहचते. धूम्रपान करणाऱयांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसते आहे. 2019 मध्ये अंदाजे 80 लाख लोकांचा धुम्रपानामुळे मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. यात युवकांना सिगारेटचे मोठय़ा प्रमाणात व्यसन लागले आहे, असे दिसून आले आहे. धुम्रपान थांबवण्यासाठीचे प्रयत्न अपुरे पडत आहेत. 1990 नंतरच्या 9 वर्षात धूम्रपान करणाऱयांची संख्या 150 दशलक्षच्या वर वाढली आहे. धूम्रपान करणाऱयांची एकूण संख्या 1.1 अब्जावर पोहचली आहे. त्यामुळे ही बाब सध्या चिंतेची ठरते आहे. धूम्रपान करणाऱयांमध्ये 89 टक्के हे 25 वर्षाखालील असल्याचीही बाब स्पष्ट झाली असून यावरील वयाच्या लोकांमध्ये सिगारेटच्या सवयीचे प्रमाण अत्यल्प आहे, असे दिसले आहे. इन्स्टिटय़ूट फॉर हेल्थ मेट्रीक्स अँड इव्हॅल्युएशनमधील संशोधिका मॅरीसा रेटसमा यांनी वरील माहिती संशोधनातून मांडली आहे. यासाठी त्यांनी 204 देशांचा सविस्तर अभ्यास केला आहे. जगभरातील देशांचा विचार केला असता 10 देशात सिगारेट पिणाऱयांची संख्या दोन तृतियांश आहे. यात भारत, चीन, इंडोनेशिया, अमेरिका, रशिया, बांगलादेश, जपान, तुर्की, व्हिएतनाम आणि फिलीपीन्स या देशांचा समावेश अधिक आहे. प्रत्येक तीन व्यक्तिमागे एक व्यक्ति ही चीनमध्ये धुम्रपान करणारी असल्याचाही अभ्यास समोर आला आहे.









