मार्चअखेरपर्यंत शंभर टक्के करवसुली करण्याची मनपा आयुक्त रुदेश घाळी यांची सूचना
प्रतिनिधी /बेळगाव
महसूल विभागातील कामकाज व्यवस्थित होत नसल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांच्या समस्यांचे निवारण करण्याबरोबरच प्रलंबित फाईल आठवडय़ात निकालात काढण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला. तसेच मार्चअखेरपर्यंत शंभर टक्के करवसुली करण्याची सूचना महापालिका आयुक्त रुदेश घाळी यांनी महसूल विभागाला केली आहे.
महापालिकेच्या महसूल विभागाची बैठक शनिवारी महापालिका आयुक्तांनी घेतली. यावेळी महसूल विभागाच्या कामकाजाचा आढावा घेऊन अधिकाऱयांना विविध सूचना केल्या. महसूल उपायुक्तांच्या मनमानी कारभारामुळे कार्यालयातील कामकाज ठप्प झाले आहे. खाते बदल तसेच कर बसविणे, ई-अस्ती नोंदी वेळेवर होत नसल्याच्या तक्रारी महापालिका आयुक्तांकडे करण्यात आल्या होत्या. त्यामुळे महसूल विभागाच्या अधिकाऱयांची आणि कर्मचाऱयांची बैठक आयोजित करून नागरिकांच्या प्रलंबित फाईल निकालात काढण्याचा आदेश आयुक्तांनी बजावला.
यंदा 50 कोटी घरपट्टी वसुलीचे उद्दिष्ट महापालिकेने ठेवले आहे. यापैकी आतापर्यंत 80 टक्के घरपट्टी जमा झाली आहे. उर्वरित घरपट्टी जमा करण्याच्या दृष्टीने महसूल निरीक्षकांनी प्रयत्न करावेत, अशी सूचना महापालिका आयुक्तांनी केली. मार्चअखेरपर्यंत 100 टक्के घरपट्टी वसुली करण्याचा आदेश बजावला. खाते बदल व अन्य प्रलंबित असलेल्या फाईलबाबत अधिकाऱयांकडे विचारणा केली.
खातेबदल किंवा अन्य कोणत्याही कारणास्तव नागरिकांनी अर्ज केले असल्यास सर्व अर्ज एका आठवडय़ात निकालात काढा, अशी सूचना आयुक्तांनी केली. सोमवारपासून या आठवडय़ात केवळ प्रलंबित फाईली निकालात काढण्याचे काम पूर्ण करावे, असा आदेश दिला आहे. त्यामुळे प्रलंबित असलेल्या सर्व फाईल निकालात काढण्याची शक्मयता आहे. या बैठकीला महसूल अधिकारी, साहाय्यक महसूल अधिकारी आणि महसूल निरीक्षक, वॉर्ड क्लार्क उपस्थित होते.









