पार्सलची संख्या वाढल्याने उत्पन्नात वाढ : परिवहनला दिलासा, ग्राहकांना सवलतीच्या दरात पार्सल पाठविण्याची सोय
प्रतिनिधी /बेळगाव
गतवर्षांपासून परिवहनने उत्पन्न वाढीसाठी बसस्थानकातून कार्गो सेवा सुरू केली आहे. बससेवा पूर्वपदावर आल्याने प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्याबरोबर कार्गो सेवेला देखील प्रतिसाद वाढत आहे. व्यवसाय, धंदे पुन्हा पूर्वपदावर आल्याने बसस्थानकात 300 हून अधिक पार्सल दाखल होत आहेत.
परिवहनला कोरोनाचा प्रचंड प्रमाणात फटका बसला आहे. त्यामुळे परिवहन आर्थिकदृष्टय़ा अडचणीत सापडले आहे. यातून मार्ग काढत परिवहनने उत्पन्न वाढविण्यासाठी गेल्या वर्षांपासून कार्गो सेवा सुरू केली आहे. गतवर्षी कोरोनामुळे या सेवेला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नव्हता मात्र आता सर्व सुरळीत सुरू झाल्याने पार्सल पाठविणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे कार्गो सेवेला प्रतिसाद वाढत आहे.
राज्यांतर्गत बससेवेबरोबर महाराष्ट्र, केरळ, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, हैद्राबाद आणि गोवा राज्यात बससेवा सुरळीत सुरू झाली आहे. त्यामुळे परराज्यातून पार्सल पाठविणाऱयांची संख्या वाढली आहे. शिवाय आरटीपीसीआर मागे घेण्यात आल्याने आंतरराज्य कार्गो पार्सलची संख्या वाढली आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून संपूर्ण कर्नाटकाबरोबर, कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई आदी ठिकाणी सेवा सुरू आहे. पूर्वी पार्सल बस चालक किंवा वाहकाकडे द्यावे लागत होते. शिवाय पार्सल धान्य किंवा वस्तू स्वरूपात असल्यास त्याची (लगेज) पावती काढावी लागत होती. त्या वस्तुच्या दरामध्ये तफावत दिसत होती. मात्र आता कार्गो सेवेमुळे ग्राहकांना सवलतीच्या दरात पार्सल पाठविता येत आहे. शिवाय पार्सलची रितसर पार्वती दिली जात आहेत.
ग्राहकांनी दिलेल्या पार्सलचे वजन, आकार आणि पाठविले जाणाऱया ठिकाणाचे अंतर पाहून पार्सलचे दर आहेत. परिवहनच्या कुरिअर सेवेचे दर इतर खासगी कुरिअर सेवेपेक्षा कमी असल्याने प्रतिसाद वाढत आहे. त्यामुळे परिवहनची कुरिअर सेवा प्रवाशांची सुरक्षित सेवा म्हणून पुढे येत आहे.









