सीईओ विनय गौडांचे आवाहन : 72 टक्के लसीकरण पूर्ण
प्रतिनिधी/ सातारा
जिह्यामध्ये कोरोना लसीकरणाचे काम पूर्ण क्षमतेने वेगात सुरू असून उर्वरित आरोग्य कर्मचारी आणि नोंदणीकृत प्रंटलाईन वर्कर्स यांनी लसीकरणासाठी पुढे यावे व त्यांनी कोणत्याही जवळच्या लसीकरण सेंटरवर सकाळी 9.00 ते 5.00 या वेळेत जाऊन लवकरात लवकर (पुढील आठवडय़ात) लस टोचून घ्यावी, असे कळकळीचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा जीसी यांनी केले आहे.
सर्वच पातळ्यांवर कोरोनावर नियंत्रण करण्याचे काम प्रशासन करीत आहे. ङत्यातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून लसीकरण सुरू झाले आहे. हेल्थकेअर वर्कर्स म्हणजेच आरोग्य कर्मचाऱयांची संख्या 26 हजार 75 असून त्यापैकी तब्बल 72 टक्के जणांचे प्रथम लसीकरणाचे काम झाले आहे. 7 हजार 383 उर्वरित आहेत. तसेच आघाडीवर काम करणारे कर्मचारी म्हणजेच फ्रन्टलाइन वर्कर्स 20 हजार 35 असून त्यापैकी 71 टक्के कर्मचाऱयांचे 14 हजार 248 प्रथम लसीकरण झाले आहे.5 हजार 787 उर्वरित आहेत.
नोंदणीकृत लाभार्थी 46 हजार असून त्यापैकी तब्बल 33 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण झाले आहे. ही टक्केवारी देखील 71 टक्के आहे. 13370 उर्वरित आहेत. एकूणच 70 टक्केहून अधिक लसीकरण झाले असून ही समाधानकारक बाब असली तरी शंभर टक्के लसीकरणासाठी मुख्य कार्यकारी अधिकार्यांनी सर्वांनाच पुढे येण्याचे आवाहन केले आहे. आरोग्य यंत्रणेसह सर्व संबंधित यंत्रणा कोरोना नियंत्रणासाठी रात्रंदिवस झटत असून प्रबोधन देखील करण्यात येत आहे. मास्क वापरणे, सामाजिक अंतर आणि वारंवार हात धुणे अशी त्रिसूत्री नागरिकांनी काटेकोरपणे पाळत रहावे, असेही आवाहन देखील गौडा यांनी केले आहे.
लढय़ात नागारिकांनी साथ द्यावी
कोरोनावर पूर्ण नियंत्रण मिळेपर्यंत क्षणाचीही उसंत न घेण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला आहे. त्याला जनतेने साथ द्यावी. आरोग्य कर्मचारी इतर सर्व संबंधित अधिकारी कर्मचारी काटेकोर नियोजन करून प्रत्यक्ष उपचार रूग्ण शोधणे तसेच प्रबोधनावर देखील काम करीत आहेत. माहितीपत्रक प्रसिद्धी, पुस्तिका, घरोघरी समाजात प्रत्यक्ष प्रबोधन अशा अनेक मार्गांनी जनतेमध्ये जागृती करण्यात येत आहे. त्याला नागरिकांनी साथ देणे गरजेचे आहे, असे देखील विनय गौडा यांनी आवाहन केले आहे.








