कोलकाता नाईट रायडर्सचा युवा फलंदाज, सलामीवीर शुभमन गिलने सनरायजर्स हैदराबादविरुद्ध साकारलेली नाबाद विजयी खेळी सर्वांकडून प्रशंसेस पात्र ठरली. शुभमनने त्या लढतीत 62 चेंडूत 70 धावांची अभेद्य खेळी साकारली. अर्थात, या यशाचे रहस्य दस्तुरखुद्ध शुभमननेच उलगडून दाखवले असून पॉवर हिटिंगचा सराव आपल्यासाठी महत्त्वाचा ठरला असल्याचे त्याने नमूद केले.
‘सलामीवीर या नात्याने फलंदाजीला उतरल्यानंतर शक्य तितका कालावधीत खेळपट्टीवर ठाण मांडून गोलंदाजांना जेरीस आणावे, ही संघव्यवस्थापनाची पहिली अपेक्षा असते. आमच्यासमोर फारशी मोठी धावसंख्या नव्हती. पण, तरीही खेळपट्टीवर ठाण मांडून उभे राहिले तर धावाही होणार होत्या. मागील काही वर्षात मी सातत्याने पॉवर हिटिंगचा सराव केला आहे आणि त्या सरावाचा मला या लढतीतही फायदा झाला’, असे हा युवा फलंदाज म्हणाला.









