पाळीव प्राण्यांवर होणार उपचार
प्रतिनिधी /बेळगाव
पशुसंगोपन खात्याच्या मुख्य दवाखान्यातील पॉलिक्लिनिक विभागात नवीन ‘कॉम्प्युटर रेडिओग्राफी’ नावाच्या एक्सरे मशीनची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे आता आजारी व अपघातग्रस्त कुत्र्या-मांजरांचे एक्सरे काढणे सोयीस्कर होणार आहे. याबरोबरच पोटातील विकारांचे निदान करण्यास या मशीनद्वारे मदत होणार आहे.
पॉलिक्लिनिक दवाखान्यात मशीन नसल्यामुळे कुत्र्या-मांजरांवर उपचार करताना अडचणी निर्माण होत होत्या. तसेच पोटातील विकारांबाबत योग्य निदान लागणे अवघड बनत होते. त्यामुळे पॉलिक्लिनिक दवाखान्यात एक्सरे मशीन उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पशुवैद्यकीय उपनिर्देशकांकडे केली होती. याची दखल घेऊन उपनिर्देशकांनी एक्सरे मशीनची सोय केली आहे.
पाळीव प्राण्यांना दुखापत झाल्यास किंवा इतर आजारांचे निदान करायचे झाल्यास खासगी दवाखान्यात एक्सरेसाठी अधिक प्रमाणात खर्च करावा लागत होता. मात्र आता सरकारी पॉलिक्लिनिकमध्येच एक्सरे मशीनची सोय केल्याने श्वान आणि मांजरांवर सवलतीच्या दरात उपचार केले जाणार आहेत. मशीन दवाखान्यात उपलब्ध व्हावी, याकरिता नगरसेवक शंकर पाटील यांनीही पाठपुरावा केला होता. पॉलिक्लिनिक दवाखान्यात दररोज उपचारासाठी शेकडो कुत्री, मांजरे, शेळय़ा-मेंढय़ा येतात. आता कायमस्वरुपी एक्सरे मशीनची सोय झाल्याने पाळीव प्राण्यांवर उपचार करणे सोयीस्कर होणार आहे.









