प्रतिनिधी / पणजी :
गेल्या 16 दिवसात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत पेट्रोल-डिझेल दरवाढीचा ‘रेकॉर्ड ब्रेक’ झाला असून त्यांच्या विरोधात आवाज उठविण्यासाठी सोमवार दि. 29 रोजी सकाळी 10 ते दुपारी 12 वा. या वेळेत म्हापसा व मडगाव येथे एकाच वेळी गोवा प्रदेश काँग्रेसतर्फे निदर्शने करण्यात येणार आहेत.
पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, डिझेलचे प्रति लिटर दर प्रथमच पेट्रोलच्या पुढे गेले आहेत. सध्या पेट्रोलचा दर 79.92 तर डिझेल दर 80.02 प्रति लिटर असून केंद्रातील मोदी सरकारने या दरवाढीतून अबकारी कराच्या माध्यमातून सर्व सामान्य जनतेच्या खिशातून रु. 18 लाख कोटी काढले आहेत. कच्चा तेलाचे दर प्रति बॅरल कमी होत असताना देशासह गोव्यातील पेट्रोल, डिझेलचे दर प्रतिदिन वाढत आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. त्याचा निषेध म्हणून उत्तर आणि दक्षिण गोवा जिल्हय़ात हा निषेध नोंदविण्यात येणार आहे. उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर हा निषेध होणार असून राष्ट्रपतीना देण्यासाठी एक निवेदन तेथे सादर करण्यात येईल, अशी माहिती चोडणकर यांनी दिली. या दरवाढीचा फटका शेतकरी, बसवाले व जनतेला मोठय़ा प्रमाणात बसल्याचे ते म्हणाले.









