पंधरा दिवसात 9 रुपयांनी वधारले दर : वाहन चालकांचे आर्थिक गणित कोलमडले
प्रतिनिधी/ बेळगाव
आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यामुळे पेट्रोल व डिझेलचे दर दररोज वाढत आहेत. 7 जूनपासून पेट्रोलचे दर दररोज 50 ते 60 पैशांनी वाढत असून रविवारी बेळगावमध्ये पेट्रोलचा दर 81.69 तर डिझेलचा तर 74.35 रुपये झाला आहे. एकीकडे कोरोनामुळे आर्थिक जमवाजमव करण्याची वेळ नागरिकांवर आली असताना आता यामध्ये पेट्रोल व डिझेलची भर पडली आहे.
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून ते लॉकडाऊनचे नियम शिथिल करेपर्यंत देशात पेट्रोलचे दर स्थिर होते. 7 जूनपासून पेट्रोलच्या दरामध्ये वाढ होत गेली. दररोज काही पैशांनी ही दरवाढ होत होती. लॉकडाऊन काळात प्रति लिटर 73 रुपये असणारा पेट्रोलचा दर रविवारी मात्र 81 रुपयांच्या पुढे पोहोचला आहे. तब्बल 9 रुपयांनी पेट्रोलच्या दरात वाढ झाली आहे. 66 रुपयांवर असणारा डिझेलचा दर रविवारी 74 रुपयांवर पोहोचला होता. पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ झाल्याचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर होणार असल्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
आधीच आर्थिक चणचण, त्यात दरवाढ
अनेक महिन्यांनंतर पुन्हा एकदा पेट्रोलचे दर हे 80 रुपयांच्या पुढे गेले आहेत. प्रत्येक नागरिकाकडे दुचाकी असल्यामुळे याचा फटका त्यांना बसू लागला आहे. कोरोना व त्यानंतरच्या लॉकडाऊनमुळे अनेक उद्योगधंदे ठप्प आहेत. यामुळे आर्थिकदृष्टय़ा कुटुंबाचा गाडा ओढणे कठीण झाले आहे. त्यातच आता इंधन दरवाढ केली जात असल्याने सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी स्थिती झाली आहे. त्यामुळे आर्थिक गणित कसे सांभाळायचे, असा प्रश्न वाहनचालकांसमोर आहे.









