1 जुलै पासून इंडिगो सेवा करणार पूर्ववत
प्रतिनिधी / बेळगाव
लॉकडाऊनच्या काळात बंद असणाऱया विमानफेऱया पुन्हा सुरू करण्यासाठी विमान कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. बेळगाव ते बेंगळूर व बेंगळूर ते बेळगाव अशी असणारी इंडिगो कंपनीची विमानसेवा पूर्ववत होणार आहे. 1 जुलैपासून ही सेवा सुरू करण्यात येणार असल्याने आणखी एका विमानाची भर पडणार आहे.
कोरोनाच्या धास्तीमुळे देशातील विमानसेवा बंद करावी लागली होती. तब्बल दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर मे अखेरपासून विमानसेवा सुरू करण्यात आली. प्रवाशांची संख्या जसजशी वाढत गेली तसतसे विमानसेवा पूर्ववत होवू लागली. बेळगावला येणाऱया व जाणाऱया प्रवाशांची संख्या अधिक असल्यामुळे सर्वच शहरांच्या सेवा आता पूर्ववत होवू लागल्या आहेत. यापूर्वी इंदूर, अहमदाबाद, हैद्राबाद, मुंबई, बेंगळूर, पुणे, म्हैसूर, जयपूर या शहरांना बेळगावमधून विमानसेवा सुरू आहे.
अशी असणार विमानसेवा
इंडिगो कंपनीची ही बेळगाव – बेंगळूर व बेंगळूर – बेळगाव ही विमानसेवा दररोज असणार आहे. सकाळी 11 वा. हे विमान बेंगळूर येथून उड्डाण घेवून 12 .30 वा. बेळगावला पोहचणार आहे. दुपारी 1 वा. बेळगाव विमानतळावरून उड्डाण केलेले विमान 2.30 वा. बेंगळूरला पोहचणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.









