पुलंनी त्यांच्या हयातीत अनेक देणग्या दिल्या. त्या पैशांच्या स्वरूपातल्या होत्या. त्यांच्यामुळे मला दोन अमूल्य देणग्या मिळाल्या. आठ वर्षांपूर्वी मी लिहीत असलेल्या एका सदरातला पुलंचा उल्लेख वाचून डॉ. विठ्ठल प्रभू यांनी संपर्क साधला. प्रभू सर पुलंचे विद्यार्थी. दादरचे रहिवासी. परिचय झाल्यावर आमचा फेसबुकवर नियमित संवाद सुरू झाला. प्रभू सर आणि श्रीकांत ठाकरे वर्गमित्र होते. ‘गोष्ट एका रात्रीची’ या पुस्तकात त्यांनी या मैत्रीच्या काही मजेदार आठवणी लिहिल्या आहेत. आमच्या मुंबईच्या भेटीत त्यांनी मला टॅक्सीत बसवून दादरचा त्यांच्या मनातला परिसर दाखवला. त्यांचा शाळेतला वर्ग, समुद्रकिनारा, पुलंच्या न लिहिलेल्या आठवणी. आम्ही दादरला फेसबुक मित्रांचे संमेलन भरवले तेव्हा त्याचे अध्यक्षपद स्वीकारले आणि सपत्नीक त्यात मनापासून सहभागी झाले. माझ्या मित्राच्या दिवाळी अंकासाठी आवर्जून लेखन केले. आता प्रभू सर हयात नाहीत.
दुसरी देणगी म्हणजे प्रा. अयाचित सर. तीन वर्षांपूर्वी त्यांनीही माझ्या सदरातील पुलंचा संदर्भ वाचून माझा फोन नंबर मिळवला. एका सकाळी घरी आले. प्रा. स. मो. अयाचित हे डेक्कन कॉलेजमध्ये संस्कृतचे प्राध्यापक होते. त्यांची स्मरणशक्ती तल्लख होती. शेवटपर्यंत ते त्यांच्या आवडीच्या संशोधनपर कार्यात मग्न होते. दोन वर्षांपूर्वी एका अपघातामुळे मी रुग्णालयात दाखल असताना भेटायला आले. माझ्या डोक्मयावर हात ठेवून त्यांनी काही मंत्रजप केला आणि लवकर बरा होण्याचा आशीर्वाद देऊन गेले. पुढच्याच महिन्यात हनुमान जयंतीच्या दिवशी घरी येताना पेढय़ांचा पुडा आणला. स्वतःचा वाढदिवस असल्याचे सांगितले. मात्र केकला नकार दिला. औक्षणाला तयार झाले. मुक्तेश्वरांच्या हस्तलिखिताबाबतीत काही कामासाठी ते नागपूरला निघाले होते. जाण्यापूर्वी त्यांनी नुकत्याच लिहिलेल्या नाटकाचे हस्तलिखित मला वाचायला देऊन गेले. तीच आमची शेवटची भेट… नंतर कोरोना आला. लॉकडाऊन शिथिल झाल्यावर त्यांनी घरी जेवायला बोलावले. पण या ना त्या कारणाने ते राहून गेले. परवाच्या शनिवारी त्यांच्या निधनाचीच बातमी आली. देवाने नव्हे, पुलंनी न मागता दोन देणग्या दिल्या होत्या. देवाने त्या काढून घेतल्या. आता माझ्याकडे फक्त आठवणी आहेत.








