रेल्वेस्थानकावर निरीक्षकाने पेटत्या चुलीला लाथाडले – 2 मुलांवर कोसळली गरम डाळ
वृत्तसंस्था/ लखनौ
उत्तरप्रदेशची राजधानी लखनौच्या चारबागा रेल्वेस्थानकावर आरपीएफच्या एका निरीक्षकाच्या निष्ठूर वर्तनामुळे दोन मुलांचा जीव संकटात सापडला होता. स्थानकानजीकचे अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली फुटपाथवर राहणाऱया मजुरांना हटविण्यास पोहोचलेल्या पथकाचे प्रमुख मोहित यांनी पेटत्या चुलीलाच लाथाडले आहे.
लाथ मारली तेव्हा चुलीवर डाळ शिजत होती. उकळती डाळ तेथेच बसलेल्या मजुराच्या दोन मुलांच्या अंगावर पडल्याने वेदनेने ते तडफडू लागले. स्थिती बिघडू लागल्याचे पाहून दोन्ही मुलांना तसेच सोडून रेल्वे पोलिसांचे पथक पुढे निघून गेले.
चारबाग स्थानक परिसरात अनेक वर्षांपासून राहत असलेल्या मजुरांना हटविण्यासाठी पथक पोहोचले होते. घटनेवेळी महिला चुलीवर स्वयंपाक करत होत्या. रेल्वे पोलिसांनी त्यांना त्वरित अतिक्रमण हटविण्यास सांगितले. भयभीत मजूर स्वतःची सामग्री जमवत असताना आरपीएफचे जवान नाराज झाले.
मजूर असलेल्या राजेशची दोन्ही मुले सकाळपासून उपाशी होती. त्यांच्याकरता राजेश यांची पत्नी रेखा स्वयंपाक करत होत्या. तिने पोलिसांना स्वयंपाक होईपर्यंत थांबण्याची विनंती केली. पण यामुळे निरीक्षक मोहित यांचा संताप अनावर झाला. त्यानंतर निरीक्षकाने चुलीवर जोराने लाथ मारल्याने कुकर दूर जाऊन पडला आणि त्यातील उकळती डाळ भुकेने कासावीस झालेल्या दोन्ही मुलांवर पडली. यामुळे दोन्ही मुले होरपळून तडफडू लागले. मुलांची स्थिती पाहून पोलिसांनी तेथून पोबारा केला.









