भाग्यश्री हुग्गी यांचा नियुक्तीनिमित्त सत्कार
प्रतिनिधी /बेळगाव
मनात इच्छा असली की माणूस कोणत्याही पदापर्यंत जाऊन पोहोचतो. साधा शिपाई असलेला अधिकारी झालेले पाहिले आहे. तशाच प्रकारे तुरमुरी येथे पीडीओ म्हणून काम केलेल्या भाग्यश्री हुग्गी-गुंजेरी यांनी केएमएएस परीक्षा दिली. त्यामध्ये त्यांना यश मिळाले आणि त्या महानगरपालिकेच्या उपायुक्त बनल्या आहेत. पीडीओ पदावरून थेट उपायुक्त झाल्याबद्दल त्यांच्या सहकारी पीडीओंनी सत्कार केला आहे. एक महिन्यापूर्वी त्या तुरमुरी ग्राम पंचायतमध्ये पीडीओ म्हणून कार्यरत होत्या. मात्र त्यानंतर त्या बेंगळूर येथे महानगरपालिकेमध्ये उपायुक्त म्हणून रुजू झाल्या होत्या. आता त्यांची बदली बेळगाव महानगरपालिकेमध्ये झाली आहे.
भाग्यश्री हुग्गी यांनी पीडीओ म्हणून काही वर्षे काम केले. मात्र त्यांची इच्छा केएमएएस बनण्याची होती. त्यामुळे त्यांनी केएमएएस परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. पीडीओ पदाची जबाबदारी पार पाडतच केएमएएसचा अभ्यास केला. पीडीओ आणि कुटुंबाची जबाबदारी घेत या महिलेने मोठी झेप घेतली आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.
केएमएएस पास झाल्यानंतर त्यांची बेंगळूर येथील महापालिकेच्या उपायुक्तपदी सहा महिन्यांपूर्वी नियुक्ती झाली होती. आता त्या बेळगावच्या महानगरपालिकेमध्ये उपायुक्तांचा कारभार पाहणार आहेत. बेळगावला आल्यानंतर त्यांचे पूर्वीचे सहकारी पीडीओ आणि कर्नाटक गव्हर्मेंट एम्लॉय असोसिएशन बेळगाव यांच्यावतीने सत्कार केला. त्यांना साऱयांनीच भरभरून शुभेच्छा दिल्या. यावेळी संघटनेचे अध्यक्ष गोपाल गुडसी, संचालक श्रीधर सरदार, ग्राम विकास अधिकारी अभिनंदन होसगौडर, विवेक गुरव, हर्षवर्धन, सुजाता बटकुर्की, कल्याणी चौगुले, ज्योती मेटी, वीणा हडपद आदी उपस्थित होते.









