चीनची राजधानी बीजिंगमधून समोर आलेल्या छायाचित्रांना पाहून लोक हैराण झाले आहेत. या छायाचित्रांमध्ये बीजिंग शहर ‘पिवळय़ा’ रंगात दिसून येत आहे. सोमवारी सकाळपासून बीजिंगचे लोक वाळुयुक्त वादळाला तोंड देत आहेत. मंगोलिया आणि उत्तर-पश्चिम चीनकडून येणारे वाळवंटी वादळ बीजिंगमध्ये पोहोचले आहे. चीनच्या हवामान संस्थेने याला एक दशकातील सर्वात मोठे सँडस्टॉर्म ठरविले आहे.
धुळीत हरवले शहर

चीनच्या हवामान संस्थेने सोमवारी सकाळी ‘यलो अलर्ट’ची घोषणा केली आहे. मंगोलियाकडून येणारे धूळयुक्त वादळ गांसू, शांक्सी आणि हेबैच्या प्रांतापर्यंत पोहोचले आहे, याचमुळे बीजिंग पिवळय़ा रंगात दिसून येऊ लागले आहे.
341 जण बेपत्ता
शेजारचा देश असलेला मंगोलिया देखील वाळूच्या वादळाच्या तडाख्यात सापडला आहे. यात किमान 341 लोक बेपत्ता झाले आहेत. बीजिंगला जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक मानले जाते. गोबी वाळवंटासोबत उत्तर चीनमध्ये मोठय़ा प्रमाणावर जंगलतोड होत असल्याने पर्यावरणाला धोका होण्यासह बीजिंगसाठी मोठी समस्या निर्माण झाली आहे. जंगलतोडीमुळे या वादळांना अटकाव होऊ शकत नाही. याचमुळे मार्च आणि एप्रिलमध्ये नियमित स्वरुपात बीजिंगला वाळवंटी वादळाला सामोरे जावे लागते.









