म. ए. युवा समितीची शिक्षण विभागाकडे मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
नववीच्या समाज विज्ञान पाठय़पुस्तकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी आक्षेपार्ह पाठ समाविष्ट करण्यात आला आहे. हा वैचारीक दिवाळखोरीचा प्रकार असून मराठय़ांचा गौरवशाली इतिहास बदलण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे ही पुस्तके मागे घेऊन नव्याने छपाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा महाराष्ट्र एकीकरण युवा समितीने शिक्षण विभागाला निवेदनाद्वारे दिला आहे.
कर्नाटकात नववीच्या कन्नड व इंग्रजी माध्यमाच्या समाज विज्ञान पाठय़पुस्तकातील भाग-2 ‘मोगल व मराठा’ या पाठांमध्ये ध. संभाजी महाराजांबद्दल चुकीचे लिखाण करण्यात आले आहे. तसेच छत्रपती शाहू महाराज दुसरे व मराठा साम्राज्याविषयी अपमानास्पद लिखाण करण्यात आले आहे. संभाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानचे प्रेरणास्थान असून त्यांच्यामुळेच हिंदू धर्माचे रक्षण झाले. असे असताना पाठय़पुस्तकात चुकीचा इतिहास घुसडला गेला आहे. त्यामुळे ही पुस्तके मागे घेऊन पुन्हा छपाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.
जिल्हा शिक्षण विभागाचे गॅझेटेड ऑफिसर मुदकन्नावर यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके, कार्याध्यक्ष सूरज कुडुचकर, ऍड. सुधीर चव्हाण, उपाध्यक्ष अंकुश केसरकर, सरचिटणीस श्रीकांत कदम, संतोष कृष्णाचे, सागर मुतगेकर, वासु सामजी, विनायक कावळे, रणजीत हावळाण्णाचे, अश्वजीत चौधरी, जोतिबा पाटील यांच्यासह युवा समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदन स्वीकारावे लागणार म्हणून अधिकारी गायब?
युवा समिती जिल्हा शिक्षणाधिकाऱयांना निवेदन देणार हे दोन दिवसांपूर्वीच जाहीर करण्यात आले होते. मराठय़ांचा इतिहासच बदलायला निघालेल्या कर्नाटक पाठय़पुस्तक मंडळाच्या विरोधात हे निवेदन दिले जाणार होते. मंगळवारी क्लब रोड येथील जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी गेले असता तेथे एकही वरिष्ट अधिकारी उपस्थित नव्हता. फोन करून विचारणा केली असता खानापूरला बैठक असल्याने सर्वजण गेल्याचे सांगण्यात आले. निवेदन स्वीकारावे लागणार म्हणून अधिकारी गायब झाले का? असा प्रश्न अध्यक्ष शुभम शेळके यांनी शिक्षण विभागातील कर्मचाऱयांना विचारला.









