प्रवाशांसाठी कुरिअर सेवा ठरतेय सुरक्षित, महसूल वाढीसाठी होतेय मदत
बेळगाव / प्रतिनिधी
मागील दोन वर्षांपासून परिवहनला प्रचंड प्रमाणात तोटा सहन करावा लागत आहे. झालेले नुकसान भरून काढण्यासाठी परिवहनचे सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. यासाठी परिवहनने मागील काही महिन्यांपासून सवलतीच्या दरात कार्गो सेवा सुरू केली. सुरुवातीच्या काळात म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसला तरी मागील काही दिवसांपासून प्रतिसाद वाढला आहे. बसस्थानकात उभारलेल्या कार्गो विभागातून दररोज 200 हून अधिक पार्सल विविध ठिकाणी जात आहेत. अनलॉकच्या शिथिलतेनंतर सर्व प्रकारची बससेवा विविध मार्गावर धावत आहे. त्यामुळे कुरिअर सेवेला प्रतिसाद वाढत आहे.
परिवहनने ग्राहकांच्या सेवेबरोबर उत्पन्नवाढीच्या दृष्टिकोनातून सुरू केलेल्या कुरिअर सेवेला प्रतिसाद वाढत आहे. या सेवेमुळे कर्नाटकबरोबर महाराष्ट्र, तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशमध्ये ग्राहकांना आपले पार्सल पाठविणे सोयीस्कर झाले आहे. बेळगाव मध्यवर्ती बसस्थानकातून संपूर्ण कर्नाटकाबरोबरच कोल्हापूर, पुणे, मुंबई, सोलापूर, हैदराबाद, चेन्नई आदी ठिकाणी कुरिअर सेवा पोहोचविली जाते. पूर्वी एखादे पार्सल पोहोचवायचे झाल्यास ते बस चालक किंवा वाहकाकडे द्यावे लागत होते. तसेच धान्य व वस्तू स्वरूपात असल्यास त्याची लगेज पावती काढावी लागत होती. मात्र दरामध्ये तफावत दिसत होती. कुरिअर सेवेमुळे ग्राहकांना सवलतदेखील मिळत आहे. कुरिअर विभागात पार्सल देऊन त्याची पावती घेऊन प्रवासी बसने प्रवास करू शकतात.
ग्राहकांनी दिलेल्या पार्सलचे वजन, आकार आणि पाठविल्या जाणाऱया ठिकाणाचे अंतर पाहून पार्सलचे दर ठरविले जातात. इतर खासगी कुरिअर सेवेपेक्षा परिवहनने सुरू केलेली कुरिअर सेवा सवलतीच्या दरात उपलब्ध होत असल्याने प्रतिसाद वाढत आहे. दरम्यान पार्सल उशिराने पोहोचल्यास किंवा तांत्रिक अडचण आल्यास याला संबंधित आगार जबाबदार राहणार आहे. तसेच दसरा सण तोंडावर येवून ठेपल्याने पार्सल पाठविणाऱयांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे परिवहनला कुरिअरच्या माध्यमातून महसूल मिळत आहे. त्यामुळे कुरिअर सेवा प्रवाशांची सुरक्षित सेवा म्हणून पुढे येत आहे.









