ऑनलाईन टीम / श्रीनगर :
पुंछ जिल्ह्यातील किर्णी सेक्टरमधील शाहपूरजवळ पाकिस्तानी सैन्याने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. या गोळीबारात एक जवान शहीद झाला. तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत.
पाकिस्तानने भारतीय चौक्या उध्वस्त करण्याचा प्रयत्न केला. बुलेट आणि मोर्टारने पाकिस्तानने भारतीयांना लक्ष्य केले. भारताने ही पाकिस्तानच्या गोळीबाराला चोख उत्तर दिले. या धुमश्चक्रीत एक जवान शहीद झाला, तर दोन जखमी झाले.
मागील आठवडाभरापासून पाकिस्तानी सैन्यांकडून नियंत्रण रेषेवर गोळीबार सुरू आहे. भारतीय लष्कराकडूनही पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले जात आहे. गुरुवारी देखील पाकिस्तानच्या सैन्याने जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवर फॉरवर्ड पोस्ट्स आणि खेड्यांमध्ये गोळीबार केला होता आणि युद्धबंदीचे उल्लंघन केले होते.पाकिस्तानच्या कारवाईला उत्तर देताना भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या 10 ते 12 चौक्या उद्ध्वस्त केल्या होत्या.









