प्रतिनिधी/ बेळगाव
ग्राम पंचायत निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर पहिल्या टप्प्यातील 259 ग्राम पंचायतीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी एकूण 15 हजार 491 जणांनी अर्ज दाखल केले होते. त्यामधील 4 हजार 235 अर्ज माघारी घेतले असून आता 11 हजार 256 जण रिंगणात आहेत. एकूण 4 हजार 259 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यामुळे निवडणुकीत मोठी चुरस वाढल्याचे दिसून येत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये एकूण 437 जणांची बिनविरोध निवड झाली आहे.
पहिल्या टप्प्यामध्ये बेळगाव, खानापूर, हुक्केरी, बैलहोंगल, कित्तूर, गोकाक, मुडलगी या सात तालुक्मयातील 259 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. बेळगाव तालुक्मयामधील 55 ग्राम पंचायतींची निवडणूक होत असून एकूण 1 हजार 37 सदस्य संख्या आहे. यासाठी 3 हजार 5 जण रिंगणात आहेत. यामध्ये 1 हजार 683 पुरूष व 1 हजार 322 महिला रिंगणात उतरल्या आहेत.
त्या खालोखाल हुक्केरी तालुक्मयामध्ये सर्वात जास्त जण रिंगणात आहेत. 880 जागांसाठी 2 हजार 239 जण रिंगणात आहेत. त्यामध्ये 1 हजार 83 पुरूष व 1 हजार 56 महिला यांच्यामध्ये ही लढत होणार आहे. त्याचबरोबर खानापूर तालुक्मयामध्येही मोठी चुरस असून 51 ग्राम पंचायतींमध्ये 623 सदस्य संख्येसाठी 1 हजार 719 जण रिंगणामध्ये आहेत. त्यानंतर गोकाक तालुक्मयातील 32 ग्राम पंचायतींची निवडणूक होत आहे. एकूण 625 सदस्य संख्येसाठी 1554 जण निवडणूक लढविणार आहेत.
बैलहोंगल तालुक्मयातील 33 ग्राम पंचायतींमधील 518 जागांसाठी 1246 जण रिंगणात आहेत. त्यानंतर मुडलगी तालुक्मयातील 20 ग्राम पंचायतींमधील 347 पदांसाठी 853 जण रिंगणात आहेत. निवडणुकीतील माघार घेण्याचा सोमवार हा शेवटचा दिवस होता. त्या दिवशी एकूण 4 हजार 235 अर्ज माघारी घेतले आहेत. काही जणांनी दोन ते तीन ठिकाणी अर्ज दाखल केले होते. तसेच डमी अर्जही दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्या सर्वांनी माघार घेतली आहे.
पहिल्या टप्प्यासाठी दि. 22 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता जोरदार प्रचाराला सुरूवात झाली आहे.









