नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी काँगेसने प्रचारकाची सूची प्रसिद्ध केली आहे. त्यात सोनिया गांधी, राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांची नावे आहेत. मात्र, काँगेस नेतृत्वाला आव्हान देणाऱया 23 ज्येष्ठ नेत्यांची नावे यात नाहीत. त्यामुळे या पक्षातील दरी अधिकच उघडी पडली आहे. लोकसभेतील काँगेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचे नाव मात्र आहे.
या विधानसभा निवडणुकीत काँगेसने डावे पक्ष आणि फुरफुरा शरीफचे इमाम सिद्दीकी यांच्या सेक्युलर पक्षाशी युती केली आहे. या युतीवरून काँगेसमध्ये दुफळी माजली आहे. ज्येष्ठ नेत्यांनी इंडियन सेक्युलर पक्षाशी युती करण्यास विरोध केला असून काँगेसने धर्मनिरपेक्ष परंपरा गुंडाळून ठेवली असल्याचा आरोप केला.
युतीच्या काही दिवसांपूर्वी झालेल्या ब्रिगेड मैदानावरील सभेतही गेंधळ झाला होता. या सभेत अधीर रंजन चौधरी यांचे भाषण सुरू असताना उपस्थित मुस्लीम श्रोत्यांनी अल्ला हो अकबर अशा धार्मिक घोषणा देण्यास सुरवात केली. त्यामुळे चौधरी यांनी त्यांचे भाषण अर्ध्यावर थांबवण्याची घोषणा केली. त्यावेळी डाव्या पक्षाच्या नेत्यांनी त्यांना विनंती करून भाषण पूर्ण करावयास लावले. या प्रसंगामुळे युतीतील मतभेदही काही प्रमाणात बाहेर आले. तरीही काँगेसने ही निवडणूक जोमाने लढविण्याची तयारी केली असून प्रचारकांची नावे प्रसिद्ध केली.









