पगारासाठी कामगार दुपारपासून संपावर,
धनंजय गोरे/ आनेवाड़ी
आशियाई महामार्गावरील आनेवाडी टोल नाक्यावर शेकडो कर्मचारी काम करीत आहेत. मात्र जवळपास 120 कर्मचाऱयांना गेल्या तीन महिन्यांपासून वेतन देण्यात आले नाही. शुक्रवारी दुपारपासूनच सर्वच कर्मचाऱयांनी अचानक संप पुकारल्याने टोलनाक्याच्या दोन्ही बाजूला पाच किलोमीटरच्या रांगा लागल्या होत्या. लेनवर गर्दी वाहनांची गर्दी वाढल्याने वाहने विना टोल घेताच सोडण्यात आली आहेत.
आधीच कोरोना व फास्टॅग सक्तीमुळे अनेक कर्मचाऱयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच गेल्या तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने कुटुंब चालवायचे कस ? हा प्रश्न उदभावल्याने दुपारच्या शिफ्टच्या कर्मचाऱयांनी काम बंद आंदोलन केले आहे. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली मात्र कोणीच कामावर हजर न झाल्याने दोन्ही दिशेला चालू असलेल्या दोन लेन देखील बंद करून सर्वच वाहने फ्री सोडली जात होती, दरवेळी बघ्याची भूमिका घेणारे पोलिसांनी यावेळी मात्र सर्व वाहने फ्री सोडण्याचा निर्णय घेतला.
सातारा जिह्यातील आनेवाडी टोल नाक्याचे नाव विविध उचापतीमुळे संसदेपर्यंत पोहोचले होते, त्यामुळे दिल्लीपर्यंत नाव झालेल्या आनेवाडी टोल नाक्यावर नेहमीच काही ना काही घडत असते. गेल्या वर्षीपासून येथे महिला कर्मचारी देखील कामावर टेवण्यात आल्या आहेत. शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास येथील पुरुष व महिला कर्मचाऱयांनी एकत्र येवून तीन महिने वेतन न मिळाल्याने कोणीही बूथवर न जाता टोल ऑफिसमोर बसून राहिले होते. टोल व्यवस्थापक विवेक शर्मा यांच्याशी या कर्मचाऱयांनी चर्चा केली तेव्हा त्यांनी 20 तारखेपर्यंत काम चालू ठेवा असे सांगितले. मात्र कर्मचारी काहीही ऐकण्याच्या मनस्थितित दिसत नव्हते, तीन महिन्याचे वेतन देण्याची जबाबदारी कोणीही घेत नसल्याने सर्व कर्मचारी ठिया मांडून टोल ऑफिससमोर बसले होते.
टोलवरील बोगस पावती प्रकरण ताजे असताना कामगारांचे पगार थकित झाल्याने आता आम्हाला वाली कोणी उरला नाही. गेल्या तीन महिन्यांपासून पगार न झाल्याने संसार कसा चालवायचा?, आदीच धुरात काम करावे लागत असल्याने भविष्यात विविध आजारांचा सामना करावा लागणार आहे. मात्र सदर आरोग्यबाबत टोलनाका व्यवस्थापनाला काहीच देणे-घेणे नाही. त्यामुळे लवकरात लवकर पगार करावेत अन्यथा आगामी कालवधीत तीव्र आंदोलनाचा इशारा नाव न छापण्याच्या अटीवर ‘तरुण भारत’शी बोलताना काही महिला कर्मचाऱयांनी दिली.








