नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानचे नवे पंतप्रधान फुमिओ किशिदा यांच्याची फोनवरुन चर्चा करुन त्यांचे अभिनंदन केले आहे. भारत आणि जपान यांच्यातील संबंध अधिक दृढ करण्यासंदर्भात दोन्ही नेत्यांनी बोलणी केली. भारत-प्रशांतीय क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना साहाय्य करत आहेत. हे सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी किशिदा यांच्या काळात आणखी प्रयत्न केले जाणार आहेत.
भारत आणि जपान यांच्यात विशेष धोरणात्मक सहकार्य, सामरिक सहकार्य आणि जागतिक भागीदारी या संदर्भांमध्ये गतीमान प्रगती होत आहे. यासंबंधी दोन्ही नेत्यांनी समाधान व्यक्त केले. उच्च तंत्रज्ञानाचे आदानप्रदान आणि गुंतवणूक या मुद्यांवरही दोन्ही देश एकमेकांच्या नजीक आले आहेत.
पंतप्रधान मोदींनी किशिदा यांना भारत भेटीचे निमंत्रण दिले. तसेच जपानी कंपन्यांनी भारतात गुंतवणूक करावी अशी सूचना केली. भारताने गेल्या काही वर्षांमध्ये आर्थिक सुधारणांची गती वाढविली आहे. तसेच अनेक सवलती गुंतवणुकीसाठी घोषित केल्या आहेत. जपानी कंपन्या याचा लाभ उठवू शकतात, अशी सूचना पंतप्रधान मोदी यांनी चर्चेच्या वेळी केली.
क्वॉडची प्रगती समाधानकारक
चीनच्या वाढत्या विस्तारवादाला प्रतिरोध करण्यासाठी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि जपान या चार देशांनी क्वॉड समूह स्थापन केला आहे. भारत-प्रशांतीय क्षेत्रात शांतता प्रस्थापित करणे आणि हे क्षेत्र कोणत्याही एका देशाच्या एकाधिकाराखाली असू नये, हे या समूहाचे उद्दिष्टय़ आहे. या समूहाची प्रगती उत्तमरित्या सुरु असून हा मुद्दाही दोन्ही नेत्यांच्या चर्चेत उपस्थित झाला.









