आचार्य अत्रे लिखित ‘तो मी नव्हेच!’ने शुक्रवारी साठाव्या वर्षात पदार्पण केले. नटश्रे÷ प्रभाकर पणशीकर यांनी चार तपे आणि गिरीश ओक यांनी पाचवे तप गाजवून हे नाटक अजरामर केले आहे. पाश्चात्य रंगभूमीवर नाटक चारशे-पाचशे वर्षे चालते, नटांच्या पिढय़ानपिढय़ा त्या नाटकात आपले योगदान देतात, हे हॅम्लेट, अथेल्लो सारख्या नाटकाद्वारे जगाने अनुभवले असले तरी ‘तो मी नव्हेच’च्या रूपाने मराठी रंगभूमीने सुद्धा हे वैभव सतत 60 वर्षे अनुभवले आहे. आचार्य प्रल्हाद केशव अत्रे यांच्याच भारदस्त शैलीत सांगायचे तर, दहा हजार वर्षात मराठी रंगभूमीवर असे नाटक झाले नसेल! ज्याने केवळ नाटय़गृहातच नव्हे तर कोवाड सारख्या सीमावर्ती भागात ताम्रपर्णी नदीच्या काठाला डोंगराच्या साक्षीने सात-आठ हजार शेतकरी कुटुंबांच्या उपस्थितीत, पौर्णिमेच्या चंद्राच्या प्रकाशात, डिसेंबरच्या थंडीत, दवानी ओले चिंब झालेल्या डेपरीमध्ये प्रयोग अनुभवला असेल! सतरा मैल चालून बेळगावला आम्ही नाटक पाहायला आलो होतो, आता आमच्या गावात नाटक सादर करा, असे रणजित देसाई यांच्या घरी भेट द्यायला आलेल्या पणशीकर यांना शेतकऱयांनी गळ घातली आणि तो इतिहास घडला! आजच्या काळात प्रेक्षकांच्या शोधात असणाऱया मराठी रंगभूमीच्या अंगावर शहारे आणेल असाच हा प्रसंग आहे. बार्शीच्या कोर्टात चाललेल्या माधव काझी खटल्यावरून अत्रेंनी हे नाटक लिहिले. कदाचित जागतिक रंगभूमीवर एकाच कलाकाराने पाच दीर्घ भूमिका केलेले हे त्या काळातील एकमेव नाटक असावे. लखोबा लोखंडे, दिवाकर दातार, दाजी शास्त्री दातार, कॅप्टन अशोक परांजपे आणि राधेःश्याम महाराज या पाचही भूमिकांमध्ये जीव ओतून पणशीकरांनी त्या अजरामर केल्या. पुढे हसवाफसवीमध्ये दिलीप प्रभावळकर यांनी सहा, बे दुणे पाचमध्ये प्रशांत दामले यांनी पाच तर सही रे सही च्या रूपाने भरत जाधव यांनी चार भूमिका करून या परंपरेत आपले योगदान दिले. सतीश पुळेकर, विजय चव्हाण, विजय कदम, प्रशांत दामले, भरत जाधव, रोहिणी हट्टंगडी, सुधा करमरकर, रसिका ओक आदींनी एकेका नाटकात दोन किंवा अधिक भूमिका साकारल्या, ज्या रसिकांनी डोक्मयावर घेतल्या. ‘अश्रूंची झाली फुले’या आपल्या नाटकाला नायक म्हणून कोण पणशीकर घेतला आहे असे म्हणणाऱया अत्रेंनी भेटून कौतुक केले. त्याच पणशीकरांनी त्यांचा लखोबा अजरामर केला. साठ वर्षात असंख्य किस्से आणि दंतकथांनी या नाटकाभवती प्रचंड मोठे वलय निर्माण केले आहे. आभाळा इतकी कल्पना चिमुटभर शब्दात पकडणे हे नाटककाराचे कसब आणि चिमुटभर शब्दाला आपल्या शैलीने आभाळाएवढं बनवणं हे नटाचं कसब असतं. ते साधलं की नाटक रसिकांना आवडते अशी पणशीकरांची भावना होती. स्वतःला निपाणीचा तंबाखू व्यापारी म्हणवणारा लखोबा लोखंडे इतका लोकप्रिय झाला की त्याच्या जन्मदात्यावर म्हणजे अत्रेंवर एका खलनायकाला मोठा केल्याचा आरोप झाला. या आरोपाला टोलवून लावताना अत्रे म्हणाले, तो किती हलकट होता हे दाखवणे हा माझा उद्देश नाही तर समाजातील आपण सुशिक्षित लोक किती बावळट आणि उथळ आहोत हे मला दाखवून द्यायचं होतं! सत्तरीतही पणशीकर लखोबा साकारत होते. सांगलीच्या एका प्रयोगाच्या वेळी अचानक त्यांचा आवाज बसला. विष्णुदास भावे नाटय़ मंदिराच्या मखमली पडद्यासमोर उभे राहिले आणि गळा मला साथ देत नाही, पण, प्रयोग न करता परत जाणार नाही. जेव्हा नकोसे वाटेल तेव्हा कोणीही एका रसिकाने उठून मला थांबवावे, आपल्या तिकिटाचे पैसे परत दिले जातील असे प्रांजळपणे जाहीर केले. जेव्हा नाटक सुरू झाले आणि पहिल्यांदा ते म्हणाले तो मी नव्हेच… तेव्हा त्या प्रेक्षागृहाने दमदार आवाजाचे पणशीकर अनुभवले आणि नाटय़पंढरीत टाळय़ांचा कडकडाट झाला. राधेश्याम महाराजांचे किर्तनही जोरदार झाले. नाटक संपताना सांगलीकरांनी त्यांना उभे राहून मानवंदना दिली. बेळगावात सहा दिवस सलग नाटय़प्रयोग होणार होते आणि एक व्यक्ती पणशीकर यांना घरी येण्याची विनंती करायची. एक दिवस ते त्या व्यक्तीच्या आलिशान घरी गेले. त्याने पाहुणचार केला आणि आपल्या पत्नीला भेटवले. लखोबा दिल्लीत पकडला गेला नसता तर हिच्याशी त्याचा विवाह कुटुंबाने मोठा खर्च करून करायचे ठरवले होते असे सांगितले. समाज कसा फसतो याचा अनुभव त्यांना प्रत्यक्ष समजून घेता आला. पणशीकर लखोबाच्या पात्राला ‘लव्हेबल रास्कल’ म्हणायचे. रसिकांना त्याचं पात्र सुखावते. ते सुशिक्षित, उथळ लोकांची टिंगल टवाळी करते, त्याला रसिक दाद देतात आणि त्यासाठीच त्याचा हलकटपणा स्वीकारून ते त्याच्या प्रेमात पडले असे ते पात्राचे विश्लेषण करतात. अमृत महोत्सवाच्या समारंभात त्यांची सर्व पात्रे पणशीकरांनी निवृत्त होऊ नये अशी मागणी करतात. त्या नाटकात प्रत्यक्ष स्वतःचीच भूमिका करताना पणशीकरांनी म्हटले आहे, लखोबा पन्नास वर्षे तू मला सहन केलेस, मी कधी काँग्रेसमध्ये गेलो नव्हतो तरीही….! पणशीकर हे रा स्व संघाचे अनुयायी. संस्कार भारतीचे ते पदाधिकारीही होते. चित्रपटसृष्टीमध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आहे त्याचप्रमाणे नाटय़ क्षेत्रासाठी जीवनगौरव सुरू करावा अशी त्यांची मागणी होती. विलासराव देशमुख मुख्यमंत्री आणि अशोकराव चव्हाण सांस्कृतिक मंत्री असताना काँग्रेस सरकारने जीवनगौरव सुरू केला आणि मंत्रिमंडळाने एकमताने पहिला पुरस्कार पणशीकर यांना निश्चित केला. अत्रेंच्या या नाटकात पं. नेहरू, काँग्रेसची टिंगल केली असताना आणि पणशीकरांची पार्श्वभूमी माहीत असताना त्यांना गौरवण्यात आले. इतकेच नव्हे तर तिथून पुढे त्या पुरस्काराला पणशीकर यांचेच नाव देण्यात आले! महाराष्ट्राच्या राजकीय आणि सांस्कृतिक वातावरणात असलेल्या सुजाणतेचे हे लक्षण! इथल्या नाटकांनी आणि नाटककारांनी ही सामाजिकता जपली आहे. खाडिलकरांची शारदा, कोल्हटकरांची सामाजिक नाटके, खाडिलकर, वरेरकर, अत्रेंची राजकारणावरील आणि तेंडुलकरांची दांभिक समाजावरील नाटके ही मराठी रंगभूमीचे मोठे संचित आहे. दंभ आणि खोटेपणाच्या विरोधात साहित्यीकांनी नेहमीच उभे राहिले पाहिजे, असे इथली संस्कृती सांगते. अत्रेंच्या ‘तो मी नव्हेच’ नेही तेच काम केले. आजच्या विरोधाभासाने भरलेल्या परिस्थितीत असे धाडस करणारे लेखक आणि हसत हसत वर्मावर बोट ठेवणारे नाटक होणे, होत राहणे आणि नवनव्या नाटय़ाची अशीच निर्मिती होत राहणे हीच ‘तो मी नव्हेच’ यासाठीच्या निमित्ताने मराठी रंगभूमीचीही अपेक्षा आहे!
Previous Articleपंतप्रधान मोदींची जपानच्या प्रमुखांची चर्चा
Next Article ताळगावात शेतकऱयांना मोफत भातकापणी यंत्र
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.








