नागरिकांची पाण्यासाठी भटकंती : प्रशासन-लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष, सुरळीत पाणीपुरवठय़ाची मागणी

अरुण टुमरी /काकती
न्यू वंटमुरी (ता. बेळगाव) गावात पिण्याच्या पाण्यासाठी गेली 45 वर्षे भटकंती करावी लागत आहे. या गावात अद्यापही पुरेसे पाणी मिळत नसल्याने एका हंडय़ाला 6 रुपये मोजावे लागतात. या गावातील महिला-पुरुषांना पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात मोल-मजुरीसाठी भटकंती करावी लागते. या गरीब लोकांना पिण्याचे पाणीही मोफत मिळत नाही. जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधी पिण्याच्या पाण्याचे व्यवस्थापन करण्यात अपयशी ठरले आहेत.
न्यू वंटमुरी हे टेकडीवर वसलेले गाव असून बेळगावपासून 16 कि. मी. अंतरावर आहे. जवळपास 20 हजार लोकसंख्या असलेले गाव 1976 साली स्थापन झाले आहे. येथील लोकांचे मूळगाव वंटमुरी हे हिडकल धरणात संपूर्ण गाव गेले होते.
कर्नाटक राज्य सरकारने कोणताही प्रामाणिक विचार न करता या खडकाळ डोंगर माथ्यावर घरे बांधून या लोकांचे पुनर्वसन केले. आज 45 वर्षे झाली असून पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष कायमच जाणवत आहे. पावसाळा, उन्हाळा अथवा कोरडा दुष्काळ असला तरी पाण्याची टंचाई कायमचीच आहे.
या गावात अलीकडे 12 कूपनलिका खोदाई करण्यात आल्या. मात्र पाणीच नाही. तीन कूपनलिकांना साधारण पाणी आहे. यापूर्वीही अनेकवेळा कूपनलिका खोदाई केली होती पण पाणी लागलेच नाही. गावचे पुनर्वसन करताना या बोडक्या डोंगरावर खोदाई केल्याने, जमिनीत पाणी लागेल की नाही. या जमिनीच्या भू-गर्भात पाण्याचा साठा तपासणे आवश्यक होते. मात्र याची कोणतीच दक्षता घेतली नसल्याने पाणी समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पंधरा दिवसांतून एकदा अर्धा तास पाणी सोडण्यात येते.
येथील सर्व शेती कोरडवाहू असल्याने कापूस, भुईमूग, जोंधळा, नाचणा, बटाटे आदी पिके खरीप हंगामात घेण्यात येतात. रब्बी हंगामात जमीन पाण्याअभावी पडीक राहते. रोजगारासाठी चिकोडी, संकेश्वर, अथणी ते दक्षिणेकडे काकती, होनगा, प्रभूनगर, देसूर, बेळगाव भागात रहिवाशांना रोज भटकंती करावी लागते.
सुरळीत पाणीपुरवठा करण्याची ग्रामस्थांतून मागणी
या परिस्थितीत पिण्याचे पाणी आणि रोजगारासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. सुतकट्टी येथील कृष्णा नदीपात्रातून 15 वर्षांपूर्वी पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली होती. पाईपलाईनद्वारे पाणी साठवून पुरवठा करण्यात येत होता. पण गेल्या कित्येक वर्षांपासून यंत्रणा बिघडल्यामुळे पाणीपुरवठा बंद झाला होता. या कामाकरिता तेव्हा पालकमंत्र्यांनी 70 लाखाचा निधी मंजूर करून दुरुस्ती व विद्युतपुरवठा सुरळीत केला आहे. सध्या नदीच्या पात्रात पाणी असल्याने सुरळीत पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे, अशी ग्रामस्थांतून मागणी होत आहे.









