राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी भाजपचा भावी सहकारी उल्लेख केला त्यानंतर शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी आघाडी ही तडजोड असून काँग्रेस-राष्ट्रवादीवाले आपले नाहीत आणि शरद पवार हे शिवसैनिकांचे गुरू होऊच शकत नाही असे वक्तव्य केल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी रविवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची घेतलेली भेट आणि शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना थेट दिलेला इशारा बघता सध्या राजकारणात सारं काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात एकीकडे भाजप विरूध्द शिवसेना आणि राष्ट्रवादी असा जरी संघर्ष बघायला मिळत असला तरी शिवसेना विरूध्द राष्ट्रवादी यांच्यात आता सुप्त संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. आघाडी सरकार राज्यात येऊन आता दोन वर्षे पूर्ण होतील, सत्तेसाठी एकत्र आलेले तीन पक्ष आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका एकत्र लढवतील अशी सध्या तरी शक्यता नसल्याने आता स्थानिक पातळीवरील या दोन पक्षातील नेत्यांनी एकमेकांना टार्गेट करण्यास सुरूवात केली आहे. आता जस जशा निवडणुका जवळ येतील तसे दोन्ही पक्षाचे नेते एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणार. पूर्वी शिवसेना भाजपची युती तर काँग्रेस -राष्ट्रवादीची आघाडी असल्याने या पक्षांचे पारंपरिक मतदार संघ कित्येक वर्ष ठरलेले होते, आता मात्र सत्तेत एकत्र राहताना विरोधक भाजप तसेच पुढील निवडणूक स्वबळावर लढण्याची तयारी ठेवून सत्तेत सोबत असलेल्या पक्षावर विश्वास न ठेवता आगामी निवडणुकीची तयारी करण्यासाठी काहीजण कामाला लागले असून आता कोण कोणाचा अशी संभ्रमावस्था राजकारणात पहायला मिळणार आहे. त्यामुळे एकीकडे नेते तर दुसरीकडे कार्यकर्तेच बुचकळय़ात पडताना दिसत आहेत. शिवसेना नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गिते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शिवसैनिकांचे गुरू कधीच होऊ शकत नाहीत, असे वक्तव्य करताना खळबळ उडवून दिली. गिते यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे सुनिल तटकरे यांनी पराभव केला होता तर दुसरीकडे सातारा जिह्यातील कोरेगाव मतदार संघातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांनी थेट राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांच्यावर टिका करताना शशिकांत शिंदे यांना पुन्हा मंत्री केले असते तर जिल्हा बारामतीकरांना विकला असता असा आरोप केला. याच महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदे यांचा पराभव केला होता. हा पराभव राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांच्या देखील जिव्हारी लागला होता. त्यामुळे जे सत्तेत एकत्र आहेत ते स्थानिक पातळीवर आता एकमेकांच्या विरोधात उभे ठाकलेले दिसत आहेत. विशेषतः राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष असून राष्ट्रवादीकडे असलेल्या अर्थ खात्यांच्या मार्फत शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याच्या तक्रारी अनेकदा समोर आल्यात. शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी रविवारी पुण्यात अजित पवारांना थेट इशारा देताना आता पहाटेचा शपथविधी विसरला पाहिजे, असे वक्तव्य केल्याने राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसांतील राजकीय नेत्यांची विधाने बघता सारे काही आलबेल नसल्याचे संकेत मिळत आहेत.
शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मागील ईडीचे शुक्लकाष्ट काही संपत नसून सोमवारी ईडीने सिटी बँक घोटाळय़ाप्रकरणी माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते आनंदराव अडसुळ यांच्या मुंबई आणि अमरावती येथील घरावर छापेमारी करत अडसुळ यांना ताब्यात घेतले तर दुसरीकडे भाजप नेते किरीट सोमय्या हे मंगळवारी कोल्हापूरला जात असून अडसुळ यांच्यानंतर हसन मुश्रीफ यांनाही कोणी वाचवू शकणार नसल्याचे सोमय्या म्हणाले. शिवसेनेच्या नेत्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे मोठय़ा प्रमाणात नेत्यांचे खच्चीकरण होत असून ज्या प्रताप सरनाईक यांनी अर्णव गोस्वामी आणि कंगणा राणावत यांच्या विरोधात हक्कभंग आणला ते शिवसेना नेतृत्वाला पत्र लिहून भाजपशी युती करण्याची भाषा करतात. तर ज्या भास्कर जाधव यांनी भाजपच्या 12 आमदारांच्या निलंबनाचा प्रस्ताव ठेवला ते जाधवही आज गप्प असल्याचे बघायला मिळत आहेत. सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न भाजपकडून होत असल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादी करत आहे. भाजपकडून महाविकास आघाडी सत्तेत आल्यानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री टार्गेट केले गेले. शिवसेनेचे संजय राठोड तर राष्ट्रवादीचे अनिल देशमुख घरी गेले मात्र काँग्रेसचा अद्याप कोणीही भाजपच्या रडारवर आलेला नाही. त्यातच राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी भाजपने काँग्रेसला दिलेला शब्द पाळत काँग्रेस उमेदवार रजनी पाटील याची पोटनिवडणूक बिनविरोध करताना भाजप उमेदवार संजय उपाध्याय यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज मागे घेताना भाजपने पुन्हा एकदा राष्ट्रवादी आणि शिवसेनेला अप्रत्यक्ष जोरदार चपराक दिली. शिवसेना आणि राष्ट्रवादीचे बाँडींग बघता काँग्रेसला साईडलाईन करण्याचा प्रयत्न वेळोवेळी करण्यात आल्याचे दिसले. त्यातूनच मग काँग्रेस एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर जोरदार टिका करताना राज्यात सत्तेत राहून सरकारच्या काही निर्णयाला वेळोवेळी विरोध करण्याचे काम करत आहे. गेल्याच आठवडय़ात राज्य मंत्रीमंडळाने महापालिकांमध्ये तीन सदस्यीय प्रभाग पध्दत लागू करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाला काँग्रेसने विरोध करताना दोन सदस्यीय प्रभाग लागू करण्याचा ठरावच प्रदेश काँग्रेसने केला असून याबाबत मुख्यमंत्र्यांना विनंती करणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. त्यामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पोटनिवडणुका बघता वेगवेगळी राजकीय समीकरणे बघायला मिळतील. त्याची सुरूवात भाजप आणि मनसे यांनी पालघर जिह्यातील पोटनिवडणुकांसाठीच्या युतीच्या घोषणेने केली असली तरी पितृपक्ष संपताच मोठय़ा राजकीय घडामोडी घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
प्रवीण काळे








