आरोग्य खात्याचा आदेश : कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी चाचण्या करण्याचीही सूचना
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्यातील विविध जिल्हय़ांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर आला आहे. या भागातील जनतेला अनुकूल व्हावे, या उद्देशाने राज्य सरकारने निवारा केंद्रे स्थापन केली आहेत. मात्र, या केंद्रांमध्ये कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी आरोग्य खात्याने येथे कोविड चाचण्या आणि कोरोना प्रतिबंधक लसीकरण करण्याचा आदेश दिला आहे.
राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या संचालक अरुंधती यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱयांमार्फत जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण अधिकाऱयांना यासंबंधीचे पत्र पाठविले आहे. राज्यातील काही जिल्हय़ांमध्ये पूरस्थिती आहे. या जिल्हय़ांमध्ये पूरग्रस्तांसाठी निवारा केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. तेथे आरोग्य सेवाही पुरविण्यात येत आहे. येथे खबरदारी म्हणून कोरोनासंबंधी जागृती करणे, कोविड चाचण्या आणि भारत सरकारच्या लसीकरण अभियानांतर्गत लस देण्याची व्यवस्था करावी. सदर लसीकरण वैद्यकीय अधिकाऱयांच्या उपस्थितीत करावे. प्रशिक्षण घेतलेल्या वैद्यकीय कर्मचाऱयांनाच लस देण्यासाठी नियुक्त करावे. भारत सरकारच्या कोविड मार्गसूचीनुसार लसींची उपलब्धता, एइएफआय किट आणि इतर सामुग्री असल्याची खातरजमा करून घ्यावी. जिल्हय़ांमधील निवारा केंद्रांमधील गर्भवतींना आणि मुलांसाठी द्याव्या लागणाऱया सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रमानुसार लस द्यावी, अशी सूचनाही आरोग्य विभागातील अधिकाऱयांना देण्यात आली आहे.









