प्रतिनिधी /बेंगळूर
राज्य निवडणूक आयोगामार्फत घेण्यात येणाऱया शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कामावेळी अधिकारी, कर्मचारी मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबातील वारसांना 15 लाख रुपयांची भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने घेतली.
नगरविकास खात्याचे सचिव के. एल. प्रसाद यांनी यासंबंधीचे दिशानिर्देश जारी केले आहेत. शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक सेवेतील कर्मचारी, अधिकारी जखमी किंवा मृत्यूमुखी पडल्यास त्यांच्या कुटुंबातील वारसांना भरपाई मंजूर करण्यात यावी, असा प्रस्ताव निवडणूक आयोगाने राज्य सरकारकडे पाठविला होता. सदर प्रस्ताव पडताळून सरकारने निवडणूक आयोगामार्फत घेतल्या जाण्याऱया निवडणूक कालावधीत कर्मचाऱयांचा मृत्यू झाल्यास किंवा जखमी झाल्यास मदत देण्यासंबंधी सशर्त परवानगी दिली आहे.
निवडणूक सेवेतील कर्मचाऱयाचा मृत्यू झाल्यास त्याच्या वारसांना 15 लाख रुपये भरपाई देता येईल. निवडणूक सेवेतील कर्मचाऱयाचा दहशतवाद्यांच्या किंवा समाज विरोधी कृत्ये म्हणजेच बॉम्बस्फोट, सशस्त्र हल्ल्यात मृत्यू झाल्यास त्यांच्या वारसांना 30 लाख रुपये भरपाई देता येईल. जर जखमी होवून अपंगत्व आल्यास 7.50 लाख रुपये भरपाई देता येईल, असा आदेश नगरविकास खात्याने दिला आहे.








