प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाबाधित रुग्ण आढलेल्या गावांना निर्बंधित प्रदेश म्हणून घोषित करण्यात आले होते. मात्र, आता या परिसरातील ते रुग्ण निगेटिव्ह झाल्यामुळे सोमवारपासून या परिसरातील काही निर्बंध कमी करण्यात आले आहेत. दुकाने तसेच इतर व्यवहार सुरू करण्यासाठी मुभा देण्यात आली आहे.
काही दिवसांपूर्वी बेळगुंदी, पिरनवाडी, येळ्ळूर, कॅम्प या परिसरात कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. ही सर्व गावे आणि परिसर निर्बंधित प्रदेश म्हणून जाहीर करण्यात आले होते. जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी यांनी हा आदेश दिला होता. त्यामुळे हे सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.
आठवडय़ातून केवळ तीन दिवस एक तास किराणा दुकाने, दूध डेअरी व इतर जीवनावश्यक वस्तुंना मुभा होती. त्यामुळे मोठी समस्या निर्माण झाली होती. मात्र, आता या गावांतील सर्व रुग्ण बरे झाले आहेत. क्वारंटाईनमधील संशयितांची चाचणीदेखील निगेटिव्ह आल्याने आता या परिसरातील निर्बंध कमी प्रमाणात हटविण्यात आले आहेत. असे असले तरी अजूनही ग्रामस्थांनी व नागरिकांनी नियम पाळणे बंधनकारक आहे.
या परिसरात कोणताही विवाह समारंभ किंवा इतर समारंभांवर बंदी राहणार आहे. मात्र, इतर सर्व सोयीसुविधा अधिक वेळ सुरू ठेवण्याबाबत मुभा देण्यात आली आहे. आता जनतेनेही स्वतःच खबरदारी घेणे तितकेच महत्त्वाचे आहे.









