कोरोनाच्या संकटात जिल्हा आरोग्य यंत्रणेसमोर आव्हाने
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या संकटात मुंबई आदी भागातून चाकरमान्यांच्या लोंढय़ाचे संकट जिल्हय़ावर घोंघावू लागलेले आहे. आता तर येथील पॉझिटिव्ह रुग्ण संख्या 42 इतकी झालेली आहे. भविष्यात त्यात आणखीन वाढ होण्याचा धोका आहे. अशावेळी प्रकृती गंभीर बनणाऱया रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या ‘व्हेंटिलेटर’ची कमतरता कशी भरून निघणार असा प्रश्न येथील प्रशासनासमोर आहे.
जिल्हय़ात गुहागर तालुक्यात पाहिला कोरोना रुग्ण सापडल्यानंतर येथील आरोग्य यंत्रणेला अलर्ट करण्यात आले. प्रशासनस्तरावर कोरोना प्रतिबंधासाठी उपाययोजनांची सूत्रे वेगाने फिरली. त्यासाठी आवश्यक असलेली पीपीई किटसह व्हेंटिलेटर आदी यंत्रणेचा आढावा घेण्यात आला. उपायययोजना करताना त्यामध्ये कमतरता राहू नये याकडे लक्ष वेधण्यात आले. पीपीई किट शासकिय यंत्रणेसह खाजगी संस्थांनी उपलब्ध करुन दिलेले आहे. अजूनही व्हेंटिलेटर कमतरतेचा प्रश्न येथील प्रशासनासमोर उभा आहे.
गंभीर प्रकृती बनणाऱया रुग्णांसाठी ‘व्हेंटिलेटर’ गरजेचे आहे. मात्र जिल्हा शासकिय रुग्णालयासह उपजिल्हा रुग्णालयात केवळ 21 व्हेंटिलेटर सद्या उपलब्ध असल्याचे सांगितले जातेय. खाजगी रुग्णालयात 23 असे एकूण 44 व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. ही संख्या आगामी काळात उद्भवणाऱया कोरोना संकटाचा सामना करण्याच्या दृष्टीने अपुरी असल्याचे सांगितले जात आहे. कारण सुरूवातीच्या टप्प्यात केवळ 6 पॉझिटिव्ह रुग्ण संख्या होती. त्यापैकी एकाचा मृत्यू झालेला होता. पण आता उभ्या ठाकलेल्या या सकंटात आरोग्य यंत्रणेला कोरोनाशी दोन हात करण्याची वेळ येणार आहे.
चाकरमानी मोठय़ा संख्येन जिल्हय़ात गावाकडे परतू लागलेले आहेत. गेल्या चार दिवसात जिल्हय़ातील कोरोना बाधितांची संख्या 42 वर पोहचली आहे. ही झपटयाने वाढती संख्या पाहता आरोग्य यंत्रणेवरील कामाचा ताणही आता वाढण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. बाधितांची संख्या वाढल्यास आरोग्य यंत्रणेला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. प्रकृती गंभीर बनलेल्या रुग्णांना ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात येते. पण या उपचार साधनांची असलेली कमतरता पाहता आरोग्य यंत्रणा कशाप्रकारे उपचार सेवा निभावून नेणार हा मोठा प्रश्न उभा आहे. याचा शासनस्तरावरून गांभिर्यांने विचार होण्याची गरज निर्माण झालेली आहे.
ऑक्सीजन सिलेंडरही मोठा ताण
जिल्हा रुग्णालयाबरोबरच जिल्हय़ातील इतर सरकारी रुग्णालायतही एकूण 100 ऑक्सीजन सिलिंडर उपलब्ध आहे. राज्यातील उद्योग बंद असल्याने कोल्हापूर येथील ऑक्सीजन सेंटरने रत्नागिरी जिह्याला 300 सिलेंडर देण्याची तयारी दर्शविली आहे. तर शासनाने 300 सिलेंडर देण्याला मान्यता दिली असल्याचे आरोग्य यंत्रणेकडून सांगण्यात येत आहे.









