नवी दिल्ली / वृत्तसंस्था
इंग्लंडविरुद्ध शुक्रवारपासून खेळवल्या जाणाऱया पहिल्या कसोटी सामन्यात मध्यमगती गोलंदाजाच्या दुसऱया जागेसाठी नवोदित मोहम्मद सिराज व अनुभवी इशांत शर्मा यांच्यात चुरस असणार आहे. भारतीय संघाने मंगळवारी पहिल्या सत्रात कसून सराव केला. संघाला एकूण तीन सत्रात सराव करणे शक्य असून चेपॉकची पारंपरिक खेळपट्टी फिरकी गोलंदाजीला पोषक ठरत आली असल्याने या पार्श्वभूमीवर भारतीय संघ 2 जलद व 3 फिरकी गोलंदाजांना खेळवण्याची शक्यता आहे.
‘खेळपट्टी टिपिकल चेपॉक विकेट आहे. इंग्लिश खेळपट्टय़ांचा गंधही येथे येणार नाही. येथील वातावरण दमट आहे. खेळपट्टीवर थोडे गवत असू शकते. यामुळे फिरकी गोलंदाजीला मदत मिळू शकेल’, असे बीसीसीआयमधील एका सूत्राने गोपनियतेच्या अटीवर सांगितले.
जलद गोलंदाजीची मुख्य धुरा जसप्रित बुमराहकडे असेल, हे निश्चित आहे. मात्र, त्याचा सहकारी कोण असेल, याचा निर्णय मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भरत अरुण व कर्णधार विराट कोहली या त्रिकुटावर अवलंबून असणार आहे.
32 वर्षीय इशांतने मागील वर्षभरापासून कसोटी क्रिकेट खेळलेले नाही तर दुसरीकडे, सिराजने 3 सामन्यात 13 बळी घेतले असून यात ब्रिस्बेन कसोटीतील डावात 5 बळींच्या पराक्रमाचा समावेश आहे. इशांतने अलीकडेच सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेतील 4 सामन्यात 14.1 षटके गोलंदाजी करत व्यावसायिक क्रिकेटमध्ये पुनरागमन नोंदवले आहे.
फिरकीत तिसरा गोलंदाज कोण?
फिरकी गोलंदाजीच्या आघाडीवर ऑफ-ब्रेक रविचंद्रन अश्विन व डावखुरा मनगटी गोलंदाज कुलदीप यादवचा सहभाग गृहित धरला जातो. मात्र, बहरातील वॉशिंग्टन सुंदर व डावखुरा अक्षर पटेल यांच्यापैकी कोणाला संधी मिळेल, हे अद्याप निश्चित नाही. वॉशिंग्टन सुंदरने अर्धशतक झळकावले. शिवाय, पदार्पणात 4 बळीही घेतले आहेत. दुसरीकडे, अक्षर पटेल मधल्या फळीत उपयुक्त फलंदाजी करु शकतो. शिवाय, तो जडेजाला योग्य पर्याय ठरण्याची क्षमताही राखून असतो.
पंडय़ाचा बुधवारपासून सराव
अष्टपैलू हार्दिक पंडय़ाचा क्वारन्टाईन कालावधी बुधवारी सकाळी संपत असून त्यानंतर तो संघात सरावासाठी दाखल होऊ शकेल. अर्थात, इंग्लंडविरुद्ध पहिल्या कसोटी सामन्यात तो खेळण्याची शक्यता कमी असून जागतिक कसोटी चॅम्पियनशिपची फायनल व इंग्लंडमधील 5 सामन्यांच्या कसोटी मालिकेवर त्याचे मुख्य लक्ष केंद्रित असेल, असे संकेत आहेत.









