श्रीनगर / वृत्तसंस्था
काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कारनामे सुरूच असून अनंतनाग जिल्हय़ात शनिवारी झालेल्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. रानिपोरा भागातील क्वारिगम येथे काही दहशतवादी लपल्याची माहिती गोपनीय सूत्रांकडून प्राप्त झाल्यानंतर सुरक्षा दलाकडून विशेष शोधमोहीम राबविण्यात आली. मोहिमेदरम्यान लष्कराने दहशतवाद्यांना शरणागती पत्करण्याचे आवाहन केले. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार केल्यानंतर चकमक उडाली. सुरक्षा जवानांनी केलेल्या गोळीबारात दोघांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या चकमकीनंतर घटनास्थळावरून शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला. तसेच सुरक्षाही अधिक कडेकोट करण्यात आली होती.









